वन्यजीवांना नियंत्रित करणारा ‘रोबो’ तयार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
  • मेळघाटच्या जंगलात लवकरच होईल कार्यरत
  • राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम 
तभा प्रतिनिधी /चंद्रपूर, 
 
वन्यप्राण्यांवर नियंत्रण ठेवताना वनकर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते. एखादा वाघ, बिबट नरभक्षक झाला, तर त्याला जेरबंद करण्यासाठी बेशुद्धीचे ‘डॉट’ वापरावे लागते आणि हे मोठे कठीण काम असते. ते सोपे जावे, शिवाय वन्यजीव नियंत्रणात यावे यासाठी स्वयंचलित रोबो असणे जास्त सुकर होते. यावर काम करीत येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाने एक रोबो तयार केला आहे आणि तो लवकरच मेळघाटच्या जंगलात रुजू होणार आहे.
 

 
 
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अभयारण्यात येत्या महिनाभरात चंद्रपूरचा हा रोबोट मदतीला रवाना होणार आहे. हा रोबो ३० दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य या महाविद्यालयाला देण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी होताच संपूर्ण अभयारण्यात हा रोबोट जाण्याची शक्यता महाविद्यालयाने व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, या रोबोटच्या ‘ॲक्शन प्लॅन’ची पाहणी करून संबंधित विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ताडोबा-अंधारी व्याघ प्रकल्पातही या रोबोटद्वारे वन्यजीवांना सुरक्षित ठेवले जाईल, असा मानस मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्याचे महाविद्यालयाचे विद्युत विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र धात्रक यांनी सांगितले.
 
मागील काही दिवसांत मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. या संघर्षावर नियंत्रण मिळविता यावे, विशेषत: वाघ-बिबट्याला शांत ठेवावे, या प्रमुख उद्देशासह वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीवर अभ्यास व्हावा, वनकर्मचार्‍यांसह जनताही सुरक्षित राहावी, यासाठी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोबोट बनविण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू केली. मेळघाट येथील सीसीएफ रेड्डी, डीएसओ माली यांना त्याचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर रोबोट तयार करण्यासाठी लागणारा ७० हजार रुपयांचा खर्च करण्याची तयारी वनविभागाने दर्शवली. सध्या विद्यार्थी रोबोटच्या सॉप्टवेअरचे काम करीत आहेत. वन्यप्राण्यांचे चित्रीकरण जास्त प्रभाविपणे होणार असून, वन्यप्राण्यांना बेशुद्धीचे इंजेक्शन बंदुकीद्वारे रोबोटच देऊ शकणार आहे. या रोबोटचे नियंत्रण संबंधित कार्यालयातून रिमोटद्वारे केले जाईल. विशेष म्हणजे, वन्यप्राण्यांना अगदी ५ ते १० मीटरवरून शांत करता येणार आहे. हा रोबोट ५ ते ६ व्यक्तीचे काम एकटाच करू शकणार आहे, अशीही माहिती डॉ. धात्रक यांनी दिली. 
 
 
 
 
महाविद्यालयासाठी गर्वाची बाब : डॉ. खान
 
आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वन्यजीवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम रोबोट तयार केला आहे. याची दखल शासन-प्रशासन व संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे. त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तरच, या भागातील विद्यार्थी चांगले कार्य करू शकतील, अशी प्रतिकि‘या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. खान यांनी व्यक्त केली.
 
 
   
मोटर्स हायटार्क, एफपीबी, बॅटरीज, इलेक्ट्रिक स्पीड कंट्रोलर, कॅमेरा, गण आणि रिमोट आदी साहित्य या रोबोटमध्ये लावले जाणार आहेत. केवळ गन ही वनविभाग उपलब्ध करून देईल. रोबोट तयार झाल्यानंतर ५ दिवस रोबोटची प्रात्याक्षिक तपासणी केली जाणार आहे. त्यात काही बदल करावयाचे असल्यास वनविभागाच्या सहमतीने ते केले जातील. त्यानंतर रोबोट जंगलात रूजू होईल.
 
 
महाविद्यालयीन स्पर्धेतून मिळाली प्रेरणा
 
२०१८ मध्ये राजीव गांधी महाविद्यालयात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून आम्हाला खरी प्रेरणा मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे या भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळते. आपल्याकडील विद्यार्थी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास फारसे उत्सुक नसतात. शिवाय आर्थिक अडचणही असतेच, असे मत शुभम सुत्रावे, मोनाली बारेवार, ऐश्वर्या ढिमोले, भूषण व्याहाळकर, वैभव विरूटकर या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. भविष्यात असेच रोबोट तयार करण्याची आमची जिद्द असून, हा रोबोट नक्कीच यशस्वी होईल आणि वनविभागाला त्याचा लाभ होईल, असा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.