चालत्या गॅस टँकरच्या कॅबिनला लाग - सुदैवाने जीवित हानी टळली - एक्सप्रेस हायवेवरील घटना
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
चांदूर रेल्वे,
एचपीचा गॅस टँकर घेऊन जाणार्‍या ट्रकने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एक्सप्रेस हायवेवर अचानक शनिवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही.
 
 
 
 
 
 
प्राप्तमाहितीनुसार, एमएच 34 वाय 3308 या क्रमांकाचा नागपूरवरून मुंबईकडे बाटीया कंपनीचा एचपी गॅसचा टँकर घेऊन जाणार्‍या ट्रकने चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळ हायवेवर अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रकचे समोरील कॅबिन पूर्णत: जळाले आहे. ट्रकमधील चालक रामविलास यादव रा. गोरखपूर हा सुखरूप असून केवळ ट्रकचे नुकसान झाले आहे. सदर आग शॉर्टसर्कीटने लागल्याचे समजते. घुईखेड येथील गावकर्‍यांनी पाण्याच्या 3 टँकरच्या मदतीने जवळपास 1 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्यासाठी घुईखेड गावातील सरपंच विनय गोटफोडे, शेख रफीक, शेख समीर, श्रीकांत खोब्रागडे, लहानू मेश्राम, शरद लडके, नारायण पाखरे, गुड्डु सिंगारे, बंडू नाचणे, बालू मिर्चापुरे, राहुल बागडे आदींनी परिश्रम घेतले. घटनास्थळावर पोलिस प्रशासन सुद्धा तत्काळ पोहचले होते. गॅसचा टँकर रिकामा असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
 
 
 
 
उशिरा पोहचले अग्निशमन दल
आग लागल्यानंतर धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा पोहचले. त्यापूर्वीच गावकर्‍यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे दोन्ही अग्निशमन दलाच्या गाड्यांना तेव्हाच परतावे लागले.
 
 
 
 
वाहनांच्या लांबच लांब रांगा
एक्सप्रेस हायवे असल्याने वाहनांची वर्दळ एकसारखी सुरूच असते. हा अपघात झाल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जवळपास 1 तासापर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती.