माणुसकीचे दर्शन; सीआरपीएफच्या जवानाने नक्षलवाद्यासाठी केले रक्तदान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
रांची:
 
झारखंड येथे 209 कमांडो बटालियनच्या तुकडीसोबत मिशन क्रोब्रामध्ये (कठोर कारवाई) जवानांच्या चकमकीत एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. सीआरपीएफच्या 133 बटालियनचे जवान राजकुमार यांनी या नक्षलवाद्यासाठी रक्तदान करत आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले. त्यानंतर, बटालियनच्या जवानांनी या जखमी नक्षलवाद्याला रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले. या उपचारावेळी जवानातील माणुसकी पाहून अनेकांचा उर भरून आला. 
 
 
झारखंड येथील नक्षल भागात कमांडोंच्या गोळीबारात नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता.  नक्षलवाद्यास रांची येथील राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . मात्र, या नक्षलवाद्यास अनेक ठिकाणी जखम झाल्याने त्यास रक्ताची गरज असल्यांचे डॉक्टरांनी सांगितले.  हे कळताच  क्षणाचाही विलंब न करता सीआरपीएफ जवान राजकुमार हे तात्काळ रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावले. तर, सर्वप्रथम एक भारतीय म्हणून मी माझं कर्तव्य बजावत असल्याचे या जवानाने म्हटले. दरम्यान, काही वेळातच सोशल मीडियावर या जवानाचा रक्तदान करतानाचे  फोटो व्हायरल झाले. अनेकांनी सॅल्युट आणि जय हिंद म्हणत या जवानाचे कौतुक केले आहे. दरम्यान, ट्विटरवही सीआरपीएफच्या अधिकृत अकाऊंटवरुन ही माहिती शेअर करण्यात आली आहे.