वाघाने पाडला दहा शेळ्यांचा फडश्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
धामणगावात वाघाची दहशत : पाच शेळ्या वाघाच्या तावडीतून बचावल्या
गिरड:
कोरा परीसरातिल धामणगाव (गाठे) गावालगत जनावरांच्या गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवीत तब्बल दहा शेळ्यांचा फडश्या पाडला. एक शेळी गंभीर जखमी झाली.तर पाच शेळ्या वाघाच्या तावडीतून बचावल्या.हि घटना शनिवारी पहाटेच्या सुमारात घडली.या घटनेमुळे गाव परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
धामणगाव येथील शेतकरी वसंतराव आडे यांच्या मालकीच्या गावालगत जनावरांच्या गोठ्यात पट्टेदार वाघाने शिरकाव करीत शेळ्यांचा फडश्या पाडला. गोठ्यात बांधून असलेल्या सोळा शेळ्यापैकी दहा शेळ्यांना वाघाने जागीच ठार केले.एक शेळी गंभीर जखमी झाली,तर पाच शेळ्या वाघाच्या तावडीतून बचावल्या. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्या एक लाख वीस हजार रुपये किंमतीच्या होत्या .
वसंतराव आडे नेहमीप्रमाणे सकाळी जनावरांच्या गोठ्यात शिरले.दरम्यान गोठ्यात शेळ्या मृत्युमुखी आढळल्या.दरम्यान एक शेळी गंभीर अवस्थेत दिसली.पाच शेळ्या वाघाच्या तावडीतून बचावल्याचे आढळून आले. घटनेची माहिती गावात पसरताच बघणऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. मंगरूळ सहवन परिक्षेत्र अधिकारी एच.एन.नरडंगे,वनरक्षक प्रिया सावरकर,वनमित्र प्रकाश सहारे घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.पशुधन अधिकारी गायकवाड यांनी शेवनिच्छेदन केले.
घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य रोषण चौके,पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे यांनी भेट दिली. सदर शेतकऱ्यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.