विषारी दारूचे ९८ बळी; १० पोलिस अधिकारी निलंबित
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू पिल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. मेरठ, सहारनपूर, रुरकी आणि कुशीनगरमध्ये विषारी दारूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ९८ झाली आहे. मेरठमध्ये १८, सहारनपूरमध्ये ३६, रुरकीमध्ये २६ आणि कुशीनगरमध्ये ८ लोकांचे बळी गेले आहे.  याप्रकारे आतापर्यँत ३० जणांना अटक करण्यात आले असून पोलिस आणि आबकरी विभागाने राज्यभर धाडसत्र सुरु केले आहे. 
 
घटनेनंतर ४६ लोकांचे शवविच्छेदन करण्यात आले असून यामध्ये ३६ लोकांचे जीव विषारी दारूमुळे गेल्याचे स्पष्ट झाले. तसेच मेरठमध्ये १८ लोकांचे उपचारदरम्यान मृत्यू झाले आहे. सहारनपूर जिल्ह्यातील नागल, गागलहेडी आणि देवबंद क्षेत्रात रात्रभर विषारी दारू पिल्याने ४४ लोकांचे मृत्यू झाले असून ३० पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मेरठ रुग्णालयात भरती असलेल्या काही लोकांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
सरकारने नागल ठाण्याच्या प्रभारीसह १० पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे . तसेच आबकरी विभागाचे तीन निरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल ला निलंबित करण्यात आले आहे. नागल ठाण्याचे प्रभारी हरीश राजपूत, एएसआय अश्विनी कुमार, अय्युब अली आणि प्रमोद नैन व्यतिरिक्त कॉन्स्टेबल बाबूराम, मोनू राठी, विजय तोमर, संजय त्यागी, नवीन आणि सौरभ यांना सुद्धा निलंबित करण्यात आले. तसेच आबकरी विभागाचे शिपाई अरविंद आणि नीरज यांना सरकार ने निलंबित केले.