मसूद अझर पाकिस्तानात, आजारी असल्यामुळे घराबाहेर पडू शकत नाही; पाकिस्तानची कबुली
   दिनांक :01-Mar-2019
इस्लामाबाद ;
 पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतावादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान पुरावे मागत आहे. तर दुसरीकडे मसूद अझहर हा पाकिस्तानातच असून, तो आजारी असल्याने घरातून बाहेरही पडू शकत नाही, असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कबूल केले आहे.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, ''माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये आहे. तसेच सध्या तो खूप आजारी आहे. त्याचा आजार गंभीर असल्याने तो घराबाहेरही पडू शकत नाही.''
भारताने केलेल्या आरोपानंतर पाकिस्तान मसूद अझहर याला अटक करणार का? असे विचारले असता कुरैशी यांनी सांगितले की,"भारताकडे यासंदर्भातील पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. जेणेकरून पाकिस्तानी जनता आणि न्यायालयाच्या शंकांचे निरसन करता येईल.'' दरम्यान, पुलामावा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला एक डॉजियर सोपवले आहेत. त्यात पुलवामा येथील हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असल्याचे सबळ पुरावे देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही पाकिस्तानने त्याच्यावर  कारवाई केलेली नाही.