अमरावतीत सिलेंडरचा स्फोट ; ६ घरे जळून खाक
   दिनांक :01-Mar-2019
-आदिवासी नगरातली घटना
 
अमरावती,
येथील आदिवासी नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत ६ घरे जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाले असून परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
 

 
 
कॅम्प परिसरातल्या कलेक्टर कॉलनीजवळील वनिता समाज शाळेच्या मागे आदिवासी नगर आहे. या नगरातून जाणाऱ्या नाल्याच्या काठावर काही घरे आहेत. त्यातील राजू धुर्वे यांच्या घरात मध्यरात्रीनंतर सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. आगीचा प्रचंड भडका उडून राजू धुर्वे यांच्यासह त्यांच्या घराला लागून असलेल्या दिनेश केशव धुर्वे, विनोद नत्थुजी उईके, इंदिरा रामकृष्ण पेंदाम, अशोक पुरके यांच्यापण घराला आग लागली.
 
आग लागताच परिसरातील नागरिकांनी घरात असलेल्यांना सुखरूप बाहेर काढले. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करून अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. आग भीषण असल्यामुळे सहाही घरे आगीत पूर्णतः जळून खाक झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पोलिसांचे पथकही येथे पोहचले होते.
 
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, राजू धुर्वे हे महाशिवरात्रीनिमित्त पचमढीला कुटुंबासह गेले आहे. त्यांच्या घरातील सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे ही आग लागल्याचे त्यांनी सांगितले. या आगीत सहाही घरातील फ्रीज, टीव्हीसह इतर गृहउपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे आदिवासी नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी घटनास्थळी होती.