वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाचा जोश ' हाय '
   दिनांक :01-Mar-2019
-उद्या पहिला एकदिवसीय सामना 
 
हैदराबाद,
टी-२० मालिकेतील पराभवानंतर आता भारतीय संघ नव्या जोशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. तसेच, इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे  या मालिकेला महत्व प्राप्त झाले आहे. या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर भारताचा विश्वचषकासाठीचा संघ निवडण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघही या मालिकेतून विश्वचषकाची तयारी करणार आहे. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० ने निर्भेळ यश मिळवले असले तरी वन डेत त्यांना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 'टीम इंडिया' तोडीसतोड उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. उभय संघांमधील पहिला वन डे सामना उद्या शनिवारी येथील राजीव गंफही आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
 
 
भारतीय संघाने जानेवारीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत वन डे मालिकेत २-१ असे नमवले होते. ऑस्ट्रेलिया संघाची भारतातील वन डे मालिकेतील कामगिरी फार चांगली झालेली नाही. भारत दौऱ्यातील मागील तीन वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया २०१७ मध्ये भारतात पाच वन डे सामन्यांची मालिका खेळला होता आणि त्यात यजमानांनी ४-१ अशी बाजी मारली होती. 
 
 
भारताने मागील दहा वन डे सामन्यांत आठ विजय मिळवले आहेत, तर ऑस्ट्रेलियाला मागील दहा सामन्यांत आठ पराभवांचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने २५ महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी २०१७ मध्ये पाकिस्तानला (४-१) नमवून अखेरची वन डे मालिका जिंकली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २७ वन डे सामन्यांत केवळ ८ विजय मिळवले आहेत आणि या कालावधीत त्यांनी सहा वन डे मालिका गमावल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १३१ वन डे सामने झाले आहेत आणि त्यात भारताला केवळ ४७ विजय मिळवता आले, तर ऑस्ट्रेलियाने ७४ वेळा बाजी मारली. उभय संघांमध्ये १० सामने अनिर्णीत राहिले.
 
 
 
भारतीय भूमीत ऑस्ट्रेलियाने ५६ वन डे पैकी २६ सामने जिंकले आहेत आणि भारताला २५ सामन्यांत विजय मिळवता आले आहेत. पाच सामने अनिर्णीत राहिले आहेत.