अभिनंदन पोहोचले वाघा बॉर्डरवर
   दिनांक :01-Mar-2019
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान काही वेळात मायदेशी परतणार आहेत. वाघा बॉर्डरमागे अभिनंदन भारतात पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचं आगमन होणार असल्या कारणाने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही रद्द करण्यात आला. शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली.
 
 
 
अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली . संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.
पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका, सौदी अरेबियासह काही देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही सुटका करणे भाग पडल्याचे स्पष्ट होत आहे. भारतानेही ही सुटका म्हणजे तडजोड नसून जोवर अतिरेक्यांवर ठोस कारवाई करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे.
भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. यानंतर भारताने त्यांच्या सुटकेसाठी सर्वोपतरी प्रयत्न सुरु केले होते. अखेर भारतीय कुटनीतीला यश आलं आणि पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेतला.