नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील - अमित शाह
   दिनांक :01-Mar-2019
२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपा बहुमताने विजयी होईल असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असे सांगताना उत्तर प्रदेशमध्ये ७३ ते ७४ जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. अमित शहा यांनी विरोधकांवरही टीका केली. समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने काहीच फरक पडत नाही असे सांगत आम्हाला प्रत्येक परिस्थितीत निवडणूक लढण्याचा अनुभव आहे असे अमित शहांनी म्हटले. निवडणूक आम्हाला अत्यंत लक्ष देऊन लढावी लागणार आहे. १६ राज्य सरकार आणि ११ कोटी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढणार आहेत अशी माहिती अमित शहा यांनी दिली.
 
 
 
 
आज लोकांना दिल्लीत बसलेला पंतप्रधान आपला विचार करत असल्याचा खात्री आहे. आमच्यामुळे २२ कोटी लोकांच्या आयुष्यात बदल झाला. अडीच कोटी लोकांच्या घरापर्यंत वीज पोहोचवली असे अमित शहा यांनी सांगितले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करताना ज्यांनी आणीबाणी आणली त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असे  म्हणत काँग्रेसवर टीका केली. प्रियंका गांधींच्या राजकारण प्रवेशावर बोलताना प्रियंका गांधी गेल्या १२ वर्षांपासून राजकारणात असल्याचे ते म्हणाले
कोणतीही संस्था देशापेक्षा मोठी असू शकत नाही असं सांगत अमित शहा यांनी केंद्र सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सल्ला देण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे. त्यांना केंद्र सरकार आरबीआय आणि सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहेत असे विचारण्यात आले. यावेळी त्यांनी कोणत्याही संस्थेत भाजपाने मध्यस्थी केलेली नाही असे सांगितले.
‘कोणत्याही संस्थेत भाजपाने मध्यस्थी केलेली नाही. कोणतीही संस्था देशापेक्षा मोठी असू शकत नाही. देश सर्वोच्च आहे. मात्र केंद्र सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सल्ला देण्याचा अधिकार आहे. संसदेत उत्तर सरकारला द्यायचे  असते ’, असे अमित शहा यांनी म्हटले.
यावेळी अमित शहा यांनी दहशतवादी हल्ल्याची तारीख आम्ही ठरवत नाही असे सांगत जेव्हा हल्ला होईल तेव्हा उत्तर देण्यात येईल असा पाकिस्तानला इशारा दिला. आम्ही दहशतवादाविरोधात अत्यंत कठोरतेने लढा दिला आहे. आतापर्यंतच्या सर्व सरकारांशी तुलना करता आमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे असे अमित शहा यांनी सांगितले.
२६/११ नंतर काँग्रेस सरकारने काय केलं ? असा प्रश्न यावेळी अमित शहा यांनी विचारला. काँग्रेसनेही १० वर्ष पाकिस्तानशी चर्चा केली असे  सांगत पाकिस्तान चर्चैसाठी तयार होत नाही असे अमित शहा यांनी सांगितले . काश्मीरसंबंधी प्रश्न विचारले असता शस्त्र वापरणे हा अंतिम पर्याय नाही पण समोरुन शस्त्रं उचलली जात असतील तर आपण शस्त्र न उलचणे हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.