अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
   दिनांक :01-Mar-2019

छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का असल्याचं असंच मानलं जातं आहे.

 

 
 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या वेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. बारामती येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली होती. त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडही त्यांच्यासोबत होते. या दोघांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं.

 

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात पोहचले आहेत. त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी महाराजांच्या विचाराचं बोट धरून चालणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शिवसेना प्रवेशाच्या वेळी दिली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. अमोल कोल्हे यांच्या खास वकृत्वशैलीमुळे श्रोते त्यांचे भाषण आवर्जून ऐकत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली. त्याची नैतिक जबाबदारीही अमोल कोल्हे यांनी स्वीकारली होती.