संघाचा स्वयंसेवक म्हणून देशासाठी काम करणे माझे मिशन : गडकरी, पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही
   दिनांक :01-Mar-2019
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करताना केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग, जहाजबांधणी, जलसंसाधन, नदीविकास तसेच गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी मी रा. स्व. संघाचा निष्ठावान स्वयंसेवक आहे, राष्ट्राची सेवा माझ्यासाठी सर्वोपरी असल्याचे सांगितले.
 
 
 
आज राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पूर्ण बहुमताने आपले सरकार बनविणार आहे आणि पुढेही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची विकासाच्या दिशेने वाटचाल होणार आहे. सध्याही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच काम करत आहे.
 
लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर नितीन गडकरी पंतप्रधानपदाचे संभाव्य दावेदार राहू शकतात, अशा चर्चेकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले की, असे स्वप्न पाहणे म्हणजे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखे आहे.
याच्याशी माझे काहीच देणेघेणे नाही. मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. नरेंद्र मोदी सध्या पंतप्रधान आहे आणि पुन्हा पंतप्रधान होणार आहे, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, मी संघाचा स्वयंसेवक आहे. देशासाठी काम करणे आमचे मिशन आहे. देश समृद्ध, सशक्त तसेच जगातील महाशक्ती बनावी यासाठी मी काम करीत असतो. शेतकरी तसेच ग्रामीण भागातील जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना आर्थिक सामाजिक विकासाचे फायदे मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे.
 
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश गतीने विकासाच्या वाटेवर निघाला आहे. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहे, मी त्यांच्या टीमचा सदस्य आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे. त्यामुळे मी पंतप्रधान होण्याचा प्रश्नच कुठे उपस्थित होतो? ना मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात आहे, ना त्यासाठी प्रयत्नशील आहे. कोणतीही गोष्ट ठरवून करणार्‍यांपैकी मी नाही, असे गडकरी यांनी सांगितले.
 
जो माझ्याकडे येतो, त्याचे काम करण्याचा, त्याची समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न असतो. समस्या सोडवता येत नसेल तर त्याला तसे स्पष्ट सांगा, पण त्याला टाळण्याचा प्रयत्न करू नका, असे मी माझ्या अधिकार्‍यांना सांगितले आहे. या माझ्या स्वभावामुळे विरोधकही माझे मित्र झाले आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. नागपूरला मागील वेळी मी साडेतीन लाख मतांनी जिंकलो होतो, यावेळी ५ लाख मतांनी जिंकेल, असे गडकरी यांनी अतिशय आत्मविश्वासाने सांगितले.