करीना कपूर लसीकरण मोहिमेची ब्रँड अम्बॅसिडर
   दिनांक :01-Mar-2019
लसीकरणाच्या जनजागृतीसाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने लसीकरण मोहीम हाती घेतले आहे. अभिनेत्री करीना कपूरला या लसीकरण उपक्रमाचे ब्रँड अम्बॅसिडर बनविण्यात आले आहे. सीरमतर्फे चालविण्यात येणाऱ्या मोहिमेचा कालावधी वर्षभराचा आहे. समाजातील वंचित गटांमध्ये लसीकरणाचे महत्त्व आणि त्यांची गरज पोहचावी यासाठी करीना कपूर जनजागृती करताना दिसणार आहे. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर पोलिओ आणि देवी यांसारख्या रोगांचे उच्चाटन हे लसीकरणामुळेच शक्य झाले आहे. असे असले तरीही इतर काही आजारांमुळेही गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. गोवर, घटसर्प यांसारख्या आजारांमुळे मुले किंवा गर्भवती स्त्रियांचा मृत्यू होतो. यामुळेच सीरम इन्स्टिट्युटने यासंदर्भातला पुढाकार घेतला आहे.
 
 
 
एक आई म्हणून माझ्या मुलाला धोकादायक आजारांपासून दूर ठेवण्याचे महत्त्व काय असते ते मला ठाऊक आहे. त्यामुळे माझ्यासाठीही सीरमने सुरु केलेली ही मोहीम महत्त्वाची आहे. लस मिळण्याची उपलब्धता आणि त्यांचा न परवडणारा खर्च यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू होतात मात्र या मोहिमेच्या माध्यमातून पालकांमध्ये जनजागृती केली जाऊ शकते असे मत करीना कपूर खानने व्यक्त केले आहे.
लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करून त्या लशी मुलांसाठी किती आवश्यक असतात हे सांगण्यासाठी, समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही ही मोहीम हाती घेतल्याचे सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले.