श्रीराम जन्मभूमीसाठी हिदूंनी अविरत आंदोलने करावी : गोविंद शेंडे
   दिनांक :01-Mar-2019
-अशोक सिंघल व्याख्यानमालेला प्रारंभ
 
तभा वृत्तसेवा/ ब्रम्हपुरी,
१५२८ते १९४७ पर्यंत एकदाही नमाज पढल्या न गेलेल्या स्थळाला बाबरी मस्जिद का संबोधायचे. विक्रमादित्यांच्या काळातील रामजन्मभुमीवरील भव्य मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबराने मिरबॉकीकडून बाबरी मस्जिद म्हणून उभारलेला तो केवळ ढाचा होता. हिंदू समाज मात्र त्याला रामललाचे मंदिरच मानतात. ते मुक्त करण्यासाठी हिंदूंनी अविरत आंदोलनेच केली नाही, तर आपले रक्त सुध्दा सांडेल. मिनाक्षीपूरमच्या ‘त्या’ घटनेनंतर स्व. अशोक सिंघल यांच्या नेतृत्वात विश्व हिंदू परिषदेने देशभरातील हिदूंची अस्मिता जागृत केली. श्रीराम जन्मभुमी आंदोलनात नव्याने प्राण फुंकले. आता न्यायालये व तथाकथित राजकीय विरोधकांनी कितीही अडथळे आणले, तरी अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर होणारच, असा द़ृढ आत्मविश्वास विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष गोविंद शेंडे यांनी व्यक्त केला.
 
 
 
येथील एकात्मता शिक्षण संस्थेच्या वतीने हिंदू ज्ञान मंदिरच्या प्रांगणात आयोजित स्व. अशोक सिंघल स्मृती व्याख्यानमालेतील ‘रामजन्म भुमी आंदोलन व वर्तमान परिस्थिती’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. मंचावर एकात्मता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कहारे, प्रमुख अतिथी म्हणून विहिंपचे जिल्हा अध्यक्ष वासुदेव गहाणे उपस्थित होते.
 
गोविंद शेंडे म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मंदिर वाद प्रारंभी न्यायालयीन दिरंगाईमुळे चिघळला. तेव्हा अनेक वर्ष देशात हिंदू हित जोपासणारे शासन नव्हते. अशा विपरीत परिस्थितीतही ताला खोलो, शिलान्यास, कार सेवा आंदोलने करीत हिंदूंनी श्रीराम जन्मभुमी मुक्त केली. न्यायालयीन आदेशाने झालेल्या उत्खननात त्या ठिकाणी मंदिर असल्याचे पुरावे सापडले. तरीही काँग्रेसच्या तथाकथित नेत्यांनी कपिल सिब्बल यांना पुढे करून न्यायालयीन निकालाला विलंब करण्याचे कुट कारस्थान केले. वर्तमान परिस्थिती बघता कुंभमेळ्यातील धर्मसंसदेत आंदोलन तूर्तास स्थगित करून हिन्दूत्त्वाच्या पुनर्रजागरणाव्दारे लवकरात लवकर श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याचा द़ृढ निश्चय केला आहे. त्यासाठी येत्या वर्षप्रतिपदेला देशभरात गुढी उभारताना ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या तेरा अक्षरी मंत्राचा जप सर्वांना करायचा आहे. हिंदूत्वाच्या जागरणामुळेच श्रीराम जन्मभुमी श्रीरामाचे भव्य मंदिर पूर्ण होणार आहे, असेही गोविंद शेंडे म्हणाले.
 
मान्यवरांच्या स्वागतानंतर आभार व प्रास्ताविक विद्याधर भाई यांनी केले. राधिका जाणी यांनी श्रीरामावरील सुश्राव्य भजन गायिले. यावेळी संवादिनीवर आनंद शिऊरकर व तबल्यावर विजय बांगरे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे संचालन साईनाथ मस्के यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार अतुल देशकर, प्राचार्य सतिश शिनखेडे, एकात्मता शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षकवृंद, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.