निर्माते 'अभिनंदन' यांच्यावर चित्रपट बनविण्याच्या तयारीत !
   दिनांक :01-Mar-2019
 
शीर्षकाच्या नोंदणीसाठी चित्रपट निर्मात्यांची रांग  
पाकिस्तान हवाई दलाचा भारतात घुसण्याचा प्रयत्न हाणून पडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने नुकतीच सुटका केली आहे. तर दुसरीकडे चित्रपट निर्माते या साहसी घटनेला चित्रपट किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून मांडण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.  या घटनेवर आधारित चित्रपट, वेब सीरिज किंवा टीव्ही शोच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागली आहे. 

 
 
‘हफींग्टनॉस्ट डॉट इन’ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाने ज्या दिवशी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई केली, त्यानंतर लगेच मुंबईच्या अंधेरी इथल्या इंडियन पिक्चर्स प्रॉड्युसर्स असोसिएशनच्या (IMPPA) कार्यालयात जवळपास पाच प्रॉडक्शन हाऊसचे निर्माते देशभक्तीपर चित्रपटांच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी जमले होते. ‘बालाकोट’, ‘सर्जिकल स्ट्राइक्स २.०’, ‘पुलवामा अटॅक्स’ यांसारख्या शीर्षकासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू होती असं तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ‘हाऊज द जोश’ या नावाचीही नोंदणी झाल्याची माहिती आहे.
सर्जिकल स्ट्राइकवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक गल्ला जमवला. देशभक्तीपर चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल पाहता चित्रपट निर्मात्यांनी शीर्षक नोंदणीसाठी गर्दी केली आहे. आतापर्यंत ‘पुलवामा’, ‘पुलवामा : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘वॉर रुम’, ‘हिंदुस्तान हमारा है’, ‘पुलवामा टेरर अटॅक’, ‘द अटॅक्स ऑफ पुलवामा’, ‘ATS- वन मॅन शो’ या नावांची नोंदणी झाली आहे.