मुंबई पोलीस घालणार घोड्यावरून गस्त
   दिनांक :01-Mar-2019
मुंबई पोलीस करणार नवीन 'मांउटेंड कॅाप्स' पथकाची स्थापना
 
 
मुंबई : जनतेच्या रक्षणासाठी मुंबई पोलीस सदैव जागरूक असते. आता यात भरीस भर म्हणून ३८ घोडेस्वाराचा मुंबई पोलिसांच्या ताफ्यात समावेश होणार आहे. नव्याने सामील होणाऱ्या या दलाचे नाव 'मांउटेंड कॅाप्स' असे आहे. गस्त घालण्यासाठी यात घोडेस्वारांना सामील करून घेतले जाणार आहे. त्याचसोबत आक्रमक जमाव पांगविणे, गर्दीवर गर्दीमधूनच बारीक लक्ष ठेवणे यांसारखी कामेदेखील हे पथक करणार आहे. सरकारकडून यासाठी १ कोटी ९९ लाख ३० हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. 
 
 
 
लवकरच पथकासाठी ३० उमद्या घोड्यांची खरेदी करण्यात येईल. घोड्यांसाठी पागा व त्यांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येणार आहे. माउटेंड कॅाप्स पथकात १ पोलीस निरिक्षक, १ सहायक पोलीस उपनिरिक्षक, ४ पोलीस हवालदार, व ३२ पोलीस शिपाई असे एकूण ३८ कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. या दलात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.