'बादली' या निवडणूक चिन्हावर नारायण राणे लढविणार निवडणूक
   दिनांक :01-Mar-2019
 
शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी करणार शर्थीचे प्रयत्न  
 
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खा. नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. यानंतर 'बादली' या निवडणूक चिन्हावर ते निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये कोकणवासीयांचा मेळावा आयोजित होणार आहे. या मेळाव्यात राजकीय अजेंड्यावर ते काय बोलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 
 

 
 
भाजपसोबत नारायण राणेंची जवळीक होती. त्यांच्या मदतीने राणेंना राज्यसभेचे खासदारपद मिळाले आहे. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांसाठी भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती झाल्याने नारायण राणेंचा हिरमोड झाला आहे. नारायण राणे आगामी प्रचारामध्ये भाजपसोबत नसतील पण त्यांच्यावर टीका टाळणार आहेत; परंतू शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.