वैमानिक निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
   दिनांक :01-Mar-2019
नाशिक :
 भारत-पाकिस्तान तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावत असताना बडगाममध्ये हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले नाशिकमधील वैमानिक निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. नाशिकमधील गोदाकाठावर भारतमातेच्या सुपुत्राला लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात येईल. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील अंत्यदर्शनाला उपस्थित होते.
 
 
 
निनाद मांडवगणे यांचं पार्थिव आज सकाळी डीजीपीनगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव बाहेर आणले . यावेळी दोन वर्षांच्या चिमुकलीने आपल्या बाबांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून तिथे उपस्थितांचे मन हेलावले. निनाद यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे मोठा जनसमुदाय लोटला होता. यावेळी 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा नागरिक देत होते. यानंतर डीजीपीनगरहून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.
सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट टाकणाऱ्यांना वीरपत्नीचा सल्ला
 
"निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता, राहणार आणि कायम आहे. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल. पण, माझी एक विनंती आहे, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या," असा सल्ला शहिद स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे वीरपत्नीने दिला आहे. तसंच "आम्हाला युद्ध नको, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहिती नाही. आणखी निनाद जाता कामा नये," अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.