‘युद्ध नको’ची कबुतरे!
   दिनांक :01-Mar-2019
नमम 
श्रीनिवास वैद्य 
 
शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी काय पात्रता असते, माहीत नाही. परंतु, मलाला युसफझाईसारख्या खुज्या व्यक्तीला हे पारितोषिक देऊन, नोबेल पुरस्कार समितीने या पुरस्काराची महत्ता रसातळाला नेली आहे. ही मुलगी पाकिस्तानची आहे. जिवाच्या भीतीने इंग्लंडमध्ये राहते. तिथून ती भारताला वारंवार अक्कल शिकविण्याचा प्रयत्न करीत असते. आताही तिने भारत-पाकिस्तान दरम्यान जे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला आहे. ती म्हणते- भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध व्हायला नको. आताच्या अवघड स्थितीत पाकिस्तानचे व भारताचे पंतप्रधान या दोघांनी एकत्र बसून, हस्तांदोलन करून आजचा तणाव निवळण्याचा मार्ग शोधावा. मुत्सद्देगिरी दाखवून चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्न सोडवावा. मलाला बाई पाकिस्तानात जिवाला धोका आहे म्हणून इंग्लंडमध्ये पळून गेली आहे. असे असताना ती भारताला संयम पाळायचा सल्ला देते. मलाला बाईंना असा शहाजोगपणा करण्याची हिंमत, आमच्या भारतातील काही बुद्धिजीवींनी सुरू केलेल्या ‘से-नो-टू-वॉर’ (युद्धाला नाही म्हणा) या अभियानामुळे झाली आहे, हे निश्चित!
 
भारत-पाकिस्तानदरम्यान आता जो तणाव निर्माण झाला आहे, तो दहशतवादामुळेच निर्माण झाला आहे. पाकिस्तान पुरस्कृत व समर्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेने पुलवामा येथे भारतीय सैन्यावर हल्ला केला नसता, तर हे प्रकरण इतके चिघळलेच नसते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या भूमीतील जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद प्रशिक्षण केंद्राला उद्ध्वस्त केले. यात कुठे आले भारत-पाक युद्ध? खरेतर, पाकिस्तानने भारताचे आभारच मानायला हवे. पाकिस्तानच्या भूमीत दहशतवादाला थारा देणार नाही, असे वचन या देशाने सार्‍या जगाला दिले आहे. परंतु, हे वचन पाळणे पाकिस्तानला शक्य दिसत नाही. ते काम जर भारताने परस्पर केले, तर त्यासाठी एवढा थयथयाट का म्हणून करायचा? पाहुण्याच्या काठीने साप मेला म्हणून मनोमन समाधान मानत शांत बसायला हवे ना! परंतु, पाकिस्तान ते करणार नाही.
  
 
त्यासाठी त्याची काही कारणे असतील. परंतु, इथे मलाला बाईला नाक खुपसण्याचे काही कारण नव्हते. ज्या दहशतवादामुळे आपण आपल्या देशात राहू शकत नाही, तो दहशतवाद जर भारत आपल्या स्वत:च्या बळावर नष्ट करीत असेल, तर त्यात मलाला बाईंनी आनंद मानायला नको का? पण जर तसे होत नसेल, तर मग मलाला बाईंच्या एकूणच हेतूबद्दल शंका घ्यायला हवी. देवळाच्या शिखरावर कावळा बसला तरी तो गरुड होत नाही, हेच खरे. मलाला तर बोलून-चालून पाकिस्तानीच. एखाद्या प्रसंगी तिच्या अंगातील पाकिस्तानी रक्त उसळून वर येत असेल, तर तिचाही काही दोष नाही. तो रक्तबीजांचाच दोष म्हणता येईल. परंतु, आपल्या भारतातील ‘युद्ध नको’ म्हणणार्‍या मंडळींचे काय? ते तर भारताचेच अन्नपाणी ग्रहण करीत आहेत. इथल्याच लोकांच्या पैशावर चैन करीत आहेत. असे असताना या मंडळींना हे असले अभद्र विचार का सुचतात?
 
कुठल्याही विचारी व्यक्तीला युद्ध नकोच असते. युद्धातल्या कथा पुस्तकात वाचायला बर्‍या असतात. परंतु, प्रत्यक्षात युद्धाचे परिणाम फार दाहक आणि प्रदीर्घ परिणाम करणारे असतात. परंतु, काही प्रसंगी, युद्ध अपरिहार्यच होऊन बसते, त्याचे काय? श्रीकृष्णाला कुठे युद्ध हवे होते? परंतु, जेव्हा युद्ध परिहार्यच झाले तेव्हा मग तोही निश्चयाने उभा झाला. इतका की, युद्धभूमीवर सगेसोयरे बघून गर्भगळीत झालेल्या अर्जुनालाही त्याने खडसावून युद्धाला सिद्ध केले. युद्धाला भारतीय इतके का घाबरतात, हेच कळत नाही. पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडल्याबरोबर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांचे पंतप्रधान आता शांततेच्या व चर्चेच्या गोष्टी करू लागले आहेत. अशा स्थितीत खरेतर भारताने थोडे अधिक ताणून धरायला हवे. परंतु, भारतातले हे घाबरट बुद्धिवंत एकप्रकारे पाकिस्तानाचीच हिंमत वाढवत आहेत.
 
पाकिस्तान व भारत यांची तुलना करायची झाल्यास, पाकिस्तान भारताच्या पासंगालाही पुरत नाही. आर्थिक स्थिती असो वा लष्करी सामर्थ्याची गोष्ट असो. केवळ पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत म्हणून, प्रत्येक वेळी मनातल्या मनात चडफडत शांतिवार्तेचे पांढरे निशाण किती दिवस फडकविणार आहोत आपण? युद्ध झाले तर, पाकिस्तान सात दिवसांच्यावर टिकू शकणार नाही, अशी स्थिती आहे. त्याच्याजवळ पैसाच नाही. पाकिस्तान जगात भीक मागत सुटला आहे. त्या देशातही गृहयुद्ध सुरू आहे. सिंध, बलुचिस्तानात पाकिस्तान सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष खदखदत आहे. तिकडे इराण व अफगाणिस्तानही पाकिस्तानमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे तेही या देशाला कवडीचीही मदत करणार नाहीत. एक चीन सोडला तर जगातील बहुतेक सर्व देश पाकिस्तानऐवजी भारताची बाजू घेतील, अशी स्थिती आहे. चीनदेखील ऐनवेळी कच खाऊन पाकिस्तानला वार्‍यावर सोडू शकतो. याच्या उलट, भारताची स्थिती आहे. नरेंद्र मोदींसारखे दमदार नेतृत्व आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपल्या सैन्याची शस्त्रसज्जता प्रचंड वाढली आहे. आज जगातील प्रत्येक देशाला भारताच्या मैत्रीची गरज आहे. त्यामुळे ते देश भारताच्या कृतीला पाठिंबाच देतील. अशा अत्यंत अनुकूल स्थितीत, दहशतवादाचा कर्करोग समूळ नष्ट करण्याची संधी चालून आली असताना, ती गमविणे म्हणजे राष्ट्रीय मूर्खपणाच म्हणावा लागेल.
 
अशी संधी 2008 साली मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आली होती. परंतु, मेणाचा पुतळा ऊर्फ डॉ. मनमोहनसिंग  यांच्यामुळे ती आपण गमवली. या संदर्भात हवाई दलाचे निवृत्त ग्रुप कॅप्टन मोहोन्तो पानगिंग  यांचे एक वक्तव्य नुकतेच आले आहे. ते म्हणतात की, 26/11च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्‌डे नष्ट करण्याची एक विस्तृत योजना आम्ही तयार केली होती. अंतिम मंजुरीसाठी ती पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविली. एक महिना वाट पाहिली. शेवटी आम्ही ती योजना सोडून दिली. त्यावेळेस जर आम्हाला सर्जिकल स्ट्राईक करण्याची परवानगी मनमोहनसिंग सरकारकडून मिळाली असती, तर दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले गेले असते. परंतु, तसे झाले नाही. ही संधी सोडली नसती तर 2008 नंतर भारतात जे अनेक निष्पाप नागरिकांचे व जवानांचे बळी गेले, ते टाळता आले असते. हे विधान एका महत्त्वाच्या पदावरील अधिकार्‍याचे आहे. जे जेव्हा करायला हवे ते केले नाही की त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. आधीच्या राज्यकर्त्यांच्या कणखर भूमिकेच्या अभावी, भारत ही किंमत आजही मोजत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका सरसेनापतीने अशीच एक संधी गमविली होती. त्याची फार मोठी किंमत नंतर महाराजांना चुकवावी लागली.
 
आदिलशहाचा बहलोल खान नावाचा सरदार स्वराज्यावर चालून आला होता. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वात महाराजांच्या सैन्याने त्याची पुरती दाणादाण उडविली होती. शेवटी तो शरण आला. नेमकी त्याच वेळी प्रतापरावांमधील उदार हिंदू जागा झाला आणि त्यांनी महाराजांची परवानगी न घेता, बहलोल खानाला सोडून दिले. या कृत्याने महाराज संतप्त झाले आणि त्यांनी प्रतापराव गुजर यांना जाब विचारला. आपल्या चुकीचे आपण प्रायश्चित्त घेतले पाहिजे, याची स्वाभिमानी प्रतापरावांनी खूणगाठ बांधली. कालांतराने रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना, याच बहलोल खानाने स्वराज्यावर पुन्हा हल्ला केला. यावेळी मात्र प्रतापरावांनी विवेकावर भावना वरचढ होऊ दिली आणि सहा सोबती घेऊन खानाच्या प्रचंड सैन्यावर चालून गेले. हे सातही वीर अत्यंत शौर्याने लढले; परंतु खानाच्या प्रचंड सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. शेवटी ते सातही वीर मातृभूमीच्या कामी आले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही अत्यंत तेजस्वी कविता याच घटनेवर आधारित आहे. यातील ‘वेडात’ शब्द बरेच काही सांगून जाणारा आहे.
 
सांगायचे तात्पर्य हे की, संधी पुन्हा येत नसते आणि सर्वार्थाने भारताला अनुकूल वातावरणात तर अशी संधी पुन्हा येईल की नाही शंकाच आहे. त्यामुळे सुखासीन आयुष्य जगणार्‍या भारतातील बुद्धिवंतांनी ‘युद्ध नको’ची कबुतरे उडविणे सोडले पाहिजे. मोदींनी म्हटलेच आहे की, माझ्यावर विश्वास ठेवा, तर आपला मोदीद्वेष बाजूला सारून तो ठेवला पाहिजे.