पंजाबमध्ये पाकिस्तानी हेराला अटक
   दिनांक :01-Mar-2019
भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना सोडण्याचा निर्णय हा सद्भावनेतून घेतल्याचे पाकिस्तान सांगत असला तरी भारताविरोधात कट रचणे आणि नुकसान पोहोचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. पाकिस्तानचा असाच एक मनसुबा भारतीय सुरक्षादलांनी उधळून लावला आहे. सुरक्षादलांनी शुक्रवारी पंजाबमधील फिरोजपूर येथून एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. मोहम्मद शाहरुख असे या हेराचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. तो सोशल मीडियावर पाकस्थित ८ इस्लामिक समूहात सहभागी असल्याचे आढळून आले आहे.
 
 
शाहरुखकडून पाकिस्तानी सिम कार्ड आणि कॅमेरा जप्त करण्यात आले आहे. तो येथील बीएसएफ पोस्टची छायाचित्रे काढत होता.
 
 
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुखकडे पाच ते सहा पाकिस्तानी मोबाइल क्रमांकही मिळाले आहेत. तो उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. सुरक्षादलांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.