दहशतवादविरोधी युद्ध कोणत्याही धर्माविरुद्ध नाही - ओआयसी परिषदेत सुषमा स्वराज यांचे स्पष्ट प्रतिपादन - मुस्लिमबहुल परिषदेत भारताला सन्मान मिळण्याचा पहिलाच प्रसंग
   दिनांक :01-Mar-2019
अबु धाबी,
संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या आणि प्रत्येक प्रांत अस्थिर करणार्‍या दहशतवादविरोधातील लढा हा कोणत्याही धर्माविरोधात नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज शुक्रवारी येथे केले.
मुस्लिमबहुल 57 देशांचे प्राबल्य असलेल्या इस्लामिक सहकार्य परिषदेत (ओआयसी) यावेळी भारताला आजवरच्या इतिहासात प्रथमच विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री या नात्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.
 
 
 
दहशतवादाने जगभरात वेगवेगळे नाव धारण केले आहे, त्यासाठी वेगवेगळे कारण देण्यात येत आहेत; पण प्रत्येक प्रकरणात या दहशतवादाने धर्मावरच आघात केलेला आहे. संपूर्ण जगातच ते धर्मांविषयी अपप्रचार आणि युवकांची दिशाभूल करीत आहेत. या दहशतवादाविरोधात सुरू असलेला लढा जगाला भयमुक्त करण्यासाठी आहे, तो कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, असे सुषमा स्वराज यांनी या परिषदेतील आपल्या भाषणात सांगितले.
 
यापूर्वी, इंदिरा गांधी सरकारमधील वरिष्ठ मंत्री फकरुद्दिन अली अहमद यांना 1969 मधील ओआयसीच्या परिषदेत निमंत्रित करण्यात आले होते, पण पाकिस्तानच्या आग्रहाखातर हे निमंत्रण रद्द करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत या परिषदेत भारताला कधीच बोलावण्यात आले नव्हते, हे विशेष!
 
आपल्या भाषणात सुषमा स्वराज यांनी कुराणाचा दाखला दिला. इस्लाम धर्म शांततेचे प्रतीक आहे. अल्लाच्या 99 पैकी एकाही नावातून िंहसाचार असा अर्थबोध होत नाही. याचप्रकारे जगातील प्रत्येक धर्माची स्थापना शांतता, प्रेम आणि बंधूभाव यासाठीच झालेली आहे. मी आज आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 130 कोटी भारतीयांच्या वतीने आपल्यासाठी शुभेच्छा घेऊन आले आहे. या 130 कोटी लोकसंख्येत 19 कोटी नागरिक हे मुस्लिम आहेत. हे मुस्लिम बांधव भारतातील वैविधतेचे साक्षीदार आहेत. जगातील कितीतरी दहशतवादी गटांनी भारतातील मुस्लिमांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बळी पडलेल्यांचे प्रमाण फारच नगण्य आहे, याकडे स्वराज यांनी आपल्या 174 मिनिटांच्या भाषणातून उपस्थितांचे लक्ष वेधले. तथापि, या भाषणात त्यांनी कुठेही पाकिस्तानचा उल्लेख केला नाही.
पाकिस्तानचा बहिष्कार
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना निमंत्रित केल्याचा निषेध करून पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार घातला होता. ओआयसी परिषदेनेही पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. ओआयसी परिषदेचे आयोजन करणार्‍या संयुक्त अरब अमिरातने भारताला दिलेले निमंत्रण रद्द करावे, अन्यथा आम्ही बहिष्कार घालू, अशी धमकी पाकिस्तानने दिली होती. पण अमिरात आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि भारताचे निमंत्रण रद्द केले नाही. त्यामुळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी अखेर परिषदेला पाठ दाखवली. भारताच्या राजनयिक मोहिमेचा हा मोठा विजय आणि पाकिस्तानचा पराभवच मानला जात आहे.