आज अटारी-वाघा सीमेवर होणारा बीटिंग रिट्रीटचा सोहळा रद्द
   दिनांक :01-Mar-2019
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना आज भारताकडे सोपवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा सीमेवर होणारा बीटिंग रिट्रीटचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. अटारी-वाघा सीमेवर दररोज बीटिंग रिट्रीटचा कार्यक्रम होता. तो पाहण्यासाठी मोठया संख्येने नागरिक इथे उपस्थित असतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव आजचा बीटिंग रिट्रीटचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
 
 
अभिनंदन यांच्या स्वागतासाठी हवाई दलाचे पथक अटारी येथे दाखल झाले आहे. अभिनंदन यांना वाघा सीमेवरुन भारताकडे सोपवण्यात येईल असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले. अभिनंदन यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमी अटारी-वाघा सीमेवर प्रचंड उत्साह आहे. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी नागरिक मोठया संख्येने सकाळपासूनच अटारी-वाघा सीमेवर पोहोचले आहेत.
अमृतसर येथील तरुणांनी अभिनंदन यांच्यासाठी चक्क २८ किलोंचा पुष्पहार आणला आहे. शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली होती.बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांचे विमान कोसळण्याआधी त्यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमान पाडले. भारताने चहूबाजूंनी निर्माण केलेल्या दबावानंतर पाकिस्तानने गुरुवारी अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याचा निर्णय जाहीर केला.