विमानातील प्रवाशांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या आई-वडिलांना मानवंदना
   दिनांक :01-Mar-2019

विमानाने लँडिंग केल्यानंतर एक्झिट म्हणजे बाहेर पडण्याच्या दरवाजाकडे प्रवाशांची एकच गर्दी होते. प्रत्येक प्रवासी लवकरात लवकर विमानाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. पण काल रात्री उशिरा चेन्नई-दिल्ली विमानाने दिल्ली विमातळावर लँडिंग केल्यानंतर विमानाबाहेर पडण्यासाठी प्रवाशांमध्ये अशी कुठलीही धावपळ दिसली नाही. कारण सर्वांचे डोळे फक्त एकाच जोडप्याकडे लागले होते.

 

 
 

विमानात उपस्थित असलेले प्रवासी आपल्या मोबाइलमधून त्या कुटुंबाचे फोटो काढत होते. ते कुटुंब होते विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे. विमानातील प्रवाशांनी आहे त्या जागी उभे राहून निवृत्त एअरमार्शल एस.वर्थमान आणि डॉक्टर शोभा वर्थमान यांना मानवंदना दिली. बाहेर पडण्यासाठी कुठलीही धावपळ न करता वर्थमान कुटुंबियांना पहिली वाट करुन दिली. अभिनंदन यांच्या आई-वडिलांना पाहून प्रवाशांनी टाळयांचा एकच कडकडाट केला.

 

बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांचे विमान कोसळण्याआधी त्यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ लढाऊ विमान पाडले. भारताने चहूबाजूंनी निर्माण केलेल्या दबावानंतर पाकिस्तानने गुरुवारी अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याचा निर्णय जाहीर केला. आज वाघा-अटारी सीमेवरुन अभिनंदन यांना भारताकडे सोपवले जाईल. अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याकडून भारताकडे सोपवले जाईल त्यावेळी त्यांचे आई-वडिलही तिथे उपस्थित राहणार आहेत. अभिनंदन यांचे आई-वडिल दिल्लीवरुन दुसऱ्या विमानाने अमृतसरला रवाना झाले.