प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका; निवडणूक आयोगाची सक्त ताकीद
   दिनांक :10-Mar-2019
नवी दिल्ली:
 भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राईक, विंग कमांडर अभिनंदन, पाकिस्तानचे पाडलेले विमान, पुलवामा हल्ला अशा घटनांचा वापर हा स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टर्सवर केला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्षाने आपली कंबर कसली आहे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूक प्रचारामध्ये न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. शनिवारी (9 मार्च) निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकीद निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.
 
 
संरक्षण विभागातील व्यक्तींची छायाचित्रे विविध पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान वापरले जात असल्याबाबतची माहिती संरक्षण विभागाने निवडणूक आयोगाला दिली. याप्रकरणी राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना योग्य सूचना देण्याची विनंती संरक्षण विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार निर्देश देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच सशस्त्र दल देशाच्या सीमा, राजकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या संरक्षणाची महत्त्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे सशस्त्र दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा वापर निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात येऊ नये, असेही आयोगाने नमूद केले आहे.