दीपाने अल्पशा प्रशिक्षणासाठी विदेशात जावे :नादिया कॉमेनेसी
   दिनांक :10-Mar-2019
नवी दिल्ली, 
टोकियो ऑलिम्पिकचे पदक मिळविण्यास आव्हान देण्यासाठी दीपा कर्माकरला स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची िंकवा विदेशात जाण्याची काहीच गरज नाही, परंतु केवळ हवापालट म्हणून तिला विदेशात एक किंवा दोन आठवड्यांचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे,  असा सल्ला महान जिम्नॅस्ट नादिया कॉमेनसीने दीपाला दिला आहे.
 

 
पाचवेळची ऑलिम्पिक विजेती रोमानियाची नादिया कॉमेनेसी हिलासुद्धा भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरविषयी फारच आपुलकी वाटते व तिने ऑलिम्पिकपदक जिंकावे अशी तिची मनोमन इच्छा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी आव्हान उभे करण्याच्या दृष्टीने तिला विदेशात जाण्याची काहीही गरज नाही. भारतातच तिला अतिशय अनुकूल व मदतशीर प्रणाली उपलब्ध आहे.
 
सुयोग्य सुविधा असल्या तरी मी दीपाला एवढाच सल्ला देऊ इच्छिते की, तिने विदेशात जावे, ट्रेिंनग घ्यावे, पण केवळ अल्पकाळासाठी. मग अमेरिकेत किंवा अन्य देशात जिथे उत्कृष्ट जिम्नॅस्ट आहेत तिथे जावे. केवळ वातावरणात बदल म्हणून एक किंवा दोन आठवड्यांसाठी जावे आणि नंतर भारतात परतावे, असे लॉरेस वर्ल्ड स्पोर्टस्‌ अकादमीची सदस्य असलेली नादिया म्हणाली.
 
एक उत्कृष्ट जिम्नॅस्ट होण्यासाठी विशिष्ट देशात जन्माला येण्याची गरज नाही, असे नादियाचे म्हणणे आहे. निश्चितच जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका, रशिया व रोमानियासार‘या देशांचेच वर्चस्व राहिले, परंतु भारतातूनही दीपासारखे प्रतिभावान जिम्नॅस्ट जन्माला येतात. जागतिक पातळीवर दीपाने मिळविलेले यशामुळे आता हे सुनिश्चित झाले की ही दरी कमी करण्यास आता फारसा वेळ लागणार नाही, असा विश्वासही नादियाने दीपा कर्माकर : द स्मॉल वंडर या पुस्तकात व्यक्त केला आहे.
 
२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपा कर्माकर प्रॉडुनोव्हा प्रकारात प्रयत्न करत असल्याचे बघून मला आश्चर्य वाटले. हा अत्यंत व जटिल व्हॉल्ट आहे, असेही तिने म्हटले आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये दीपाचे थोडक्यात पदक हुकले. दीपा कर्माकर: द स्मॉल वंडर हे पुस्तकाचे सहलेखक दीपाचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी, विमल मोहन व दिग्विजय सिंग देव हे असून या पुस्तकात दीपाचा संघर्ष व यशाची गाथा आहे. या पुस्तकात दीपाच्या खाजगी अल्बममधील काही दुर्मिळ छायाचित्रे तसेच स्पर्धेतील छायाचित्रांचा समावेश आहे.