नागपुरात त्या विहिरीत सापडलेला दरवाजा रहस्यमयी ?
   दिनांक :10-Mar-2019
नागपूर : शहरातल्या लालगंज चकना चौक येथे एक पुरातन विहीर आहे. या विहिरीचा उपयोग काही लोकांनी कचरा टाकण्यासाठी केल्याने ती पूर्णपणे कचऱ्याने भरली होती. काही जागरूक नागरिकांनी एकत्र येत या विहिरीच्या सफाईची मागणी केली. त्यानंतर या विहिरीच्या सफाईसाठी पालिकेकडून २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.  गेल्या चार दिवसांपासून विहिरीची सफाई सुरु आहे. सफाईसोबतच या विहिरीतील अनेक रहस्यही पुढे येत आहेत. विहिरीत एक गुप्त दरवाजा सापडला आहे. तो पाहण्यासाठी लोकांची एकाच गर्दी होत असून ही रहस्यमयी विहीर सध्या परिसरात चर्चेचा विषय आहे.
 

 
 
स्थानिकांच्या मते गोंड राजाने या विहिरीचे बांधकाम केले होते. या विहिरीतून एक रस्ता रामटेक येथील ‘सीता की नानी का कुआं’ नावाच्या विहिरीत जाऊन उघडत असल्याचे सांगितले जाते. गोंडकालीन ही विहीर अतिशय खोल आहे. अजूनही सफाई सुरु आहे. विहिरीच्या सफाईसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांच्या मते, चार दिवसाच्या सफाईत विहिरीत अनेक दरवाजे दिसून येत आहेत. यातील पाणीही अतिशय शुद्ध आहे. सफाईनंतर या विहिरीचे पाणी परिसरातील जवळपास ५०० लोकांना पिण्यायोग्य उपलब्ध होऊ शकते. प्रभाग २१ मध्ये येणाऱ्या या विहिरीची रचना अतिशय सुंदर आहे.