कर्करोगाच्या ३९० औषधांच्या किमतीत ८७ टक्क्यांपर्यंत घट
   दिनांक :10-Mar-2019
नवी दिल्ली:
कर्करोगाच्या ४२ औषध घटकांच्या किमतीवर राष्ट्रीय औषध नियंत्रण प्राधिकरणाने (एनपीपीए) ३० टक्क्यांपर्यंत नफा कमाविण्याचे निर्बंध आणल्यानंतर ३९० औषधांच्या किमतीत घट झाली आहे. ही घट अगदी ३ टक्क्यांपासून ते ८७ टक्क्यांपर्यंत असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. ८ मार्चपासून नव्या दराने ही औषधे बाजारात विक्रीस उपलब्ध असणार आहेत. 

 
 
 
औषधनिर्मिती केलेल्या कंपनीने घाऊक विक्रेत्यांना विकलेली किंमत आणि प्रत्यक्ष रुग्णाला द्यावी लागणारी किंमत यातील मोठी तफावत लक्षात घेऊन ‘ट्रेड मार्जिन रॅशनलाझेन’ पद्धतीने कर्करोगाच्या ४२ औषध घटकांच्या नफ्यावर मर्यादा आणल्याचे प्राधिकरणाने २७ फेब्रुवारीला अधिसूचनेद्वारे जाहीर केले. औषधनिर्मिती कंपन्यांना ३० टक्क्यांपर्यंत नफा मिळण्याची मुभा असल्याचे स्पष्ट करताना त्यानुसार कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांना आणि प्रत्यक्ष रुग्णांना विक्री करण्याच्या किमती आधीच ठरवाव्यात, असे निर्देश प्राधिकरणाने दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने कंपन्यांनी ३९० ब्रॅण्डच्या औषधांच्या किमतींमध्ये घट केल्याचे प्राधिकरणाला कळविले आहे. या सर्व औषधांच्या किमतीमध्ये झालेली घट आणि मूळ किंमत याचा तपशील प्राधिकरणाने शुक्रवारी जाहीर केला आहे.
 
 
यामध्ये १५० रुपयांपासून ते एक लाख रुपये किमतीच्या औषधांचा समावेश आहे. नियंत्रणानंतर यातील काही औषधांच्या किमतीमध्ये ८७ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे स्पष्ट झाले. ३८ ब्रॅण्डच्या औषधांच्या किमती ७५ टक्के आणि त्यापेक्षाही अधिक घट झाली आहे, तर १२४ ब्रॅण्डच्या औषधांमध्ये ५० ते ७५ टक्के घट झाल्याचे समोर येते. १२१ बॅ्रण्डच्या किमतीमध्ये २५ ते ५० टक्के आणि १०७ ब्रॅण्डच्या किमतीमध्ये २५ टक्क्यांहून कमी घट झाल्याचे यामध्ये म्हटले आहे.