निवडणुकीचे बिगुल वाजले ; ११ एप्रिलला पहिल्या टप्यातले मतदान होणार
   दिनांक :10-Mar-2019
 
आजपासून आचारसंहिता लागू
 
दिल्ली : दिल्लीच्या विज्ञान भवनात आज ठरलेल्या वेळी संध्याकाळी ५ वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरवात झाली. या पत्रकार परिषदेकडे राजकीय क्षेत्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेला सुरवात केली. देशात आज पासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
 
ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते त्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या. एकूण सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे, त्यापैकी ११ एप्रिलला पहिल्या टप्यातले २० राज्यात ९१ मतदार संघासाठी मतदान पार पडणार आहे. तर, दुसऱ्या टप्यातले १८ एप्रिलला १३ राज्यात ९७ मतदार संघासाठी, तिसऱ्या टप्यातले २३ एप्रिलला १४ राज्यात चौथ्या टप्यातले मतदान २९ एप्रिलला, पाचव्या टप्यातले ५ मे रोजी, सहाव्या टप्यातले १२ मे रोजी, सातव्या टप्यातले १९ मे रोजी मतदान पार पडेल. सर्व निवडणुकीची मतमोजणी २३ मी रोजी होणार आहे.
 
महाराष्ट्रात एकूण चार टप्यात मतदान होणार असून ११ एप्रिलला ७ जागांसाठी, १८ एप्रिलला १० जागांसाठी , २३ एप्रिलला १४ जागांसाठी २९ एप्रिलला १७ जागांसाठी मतदान पार पडेल.
 
२०१४ च्या तुलनेत एकूण ७ लाख मतदारांची भर या निवडणुकीत पडली असून यामुळे देशातील मतदारांची संख्या ९० कोटींच्या घरात पोहोचली आहे. यात १.६० कोटी नोकरदार वर्ग मतदान करणार आहेत. देशभरातल्या विविध परीक्षेचा विचार करून आचारसंहितेचा निर्णय घेण्यात आल्याचे सुनील अरोरा यांनी सांगितले. देशभरात एकूण १० लाख मतदान केंद्र असणार असून मतदान केंद्रावर व्हीव्हीपी पॅट वापरण्यात येणार आहे. यात निवडणूक चिन्हासह उमेदवाराचा फोटोही दिसेल. देशात आचारसंहितेचा भंग करणाऱ्याची तक्रार ॲपद्वारे निवडणूक आयोगाकडे करता येणार असून तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही ते म्हणाले.