निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; लोकसभेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता
   दिनांक :10-Mar-2019
नवी दिल्ली:
 लोकसभेचे वेळापत्रक आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या मंत्र्यांना सर्वच विकासकामांची उद्धाटने ८ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे बजावले होते. त्यामुळे ९ मार्चला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा अंदाज खोटा ठरला असून आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे आजच निवडणुकांचे वेळापत्रक घोषित करण्याची शक्यता आहे. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे.
 

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र देशात लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले . भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्यात येतील अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबतचे चित्र स्पष्ट झाले होते.