धवनच्या शतकाने भारताचा धावांचा डोंगर
   दिनांक :10-Mar-2019
- ऑस्ट्रेलियापुढे ३५९ धावांचे आव्हान
 शिखर धवनचे शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३५९ धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहित-धवन या सलामी जोडीने दीडशतकी भागीदारी केली. मात्र  शतकाला अवघ्या ५ धावा हव्या असताना रोहित  बाद झाला. रिचर्डसनने त्याला बाद करत अखेर १९३ धावांवर भारताला पहिला धक्का दिला.
 
 
 
रोहितने ७ चौकार आणि २ षटकार खेचले. पण सलामीवीर शिखर धवनने धमाकेदार शतक ठोकले. त्याने चौकार लगावत ९८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. झंझावाती शतक ठोकणाऱ्या शिखर धवनचे दीडशतक मात्र हुकले. ११५ चेंडूत १४३ धावांची तुफानी खेळी करून तो बाद झाला  त्याने १८ चौकार आणि ३ षटकार लगावले.
 
 
सलग दोन सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार कोहलीला या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो ६ चेंडूत ७ धावा करून माघारी परतला. रायडूच्या जागी संधी मिळालेल्या लोकेश राहुलला चांगली सुरुवात मिळाली, मात्र तो ३१ चेंडूत २६ धावा काढून माघारी परतला. फटकेबाजी करण्यास सुरुवात करताच ऋषभ पंत माघारी परतला. त्याने २४ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार खेचत ३६ धावा काढल्या. पण कमिन्सच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. केदार जाधव फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला. केदारने १२ चेंडूत १० धावा केल्या. भुवनेश्वर कुमार २ चेंडूत १ धाव काढून झेलबाद झाला. १ चौकार आणि २ षटकार लगावत १५ चेंडूत २६ धावा करणारा विजय शंकर झेलबाद झाला. त्याला कमिन्सने बाद केले. युझवेन्द्र चहल शून्यावर बाद झाला. कमिन्सने स्वतःच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट झेल टिपला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्सने ५ बळी घेतले.
सलग दुसऱ्यांदा भारताने नाणेफेक जिंकली. गेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडलेल्या भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीची निवड केली. भारतीय संघात आज चार बदल करण्यात आले आहेत. अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी संघात अनुक्रमे लोकेश राहुल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांना स्थान देण्यात आले आहे.