युवराजांचे ‘मोदीकरण’
   दिनांक :10-Mar-2019
आता निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे कधी आणि कशाला महत्त्व येईल हे काही सांगता येत नाही. त्यातही या काळांत मने कशी हळवी झालेली असतात, त्यामुळे देव आठवतात. अनेकजण तर देव पाण्यातच बुडवून बसलेले असतात. ज्यांनी पाच वर्षे वाहत्या गंगेत केवळ हातच धुतलेत (स्वत:चे) अन्‌ त्यांच्या मतदारसंघात पाणीही नाही प्यायला जनतेला ते स्वत:चे देव मात्र पाण्यात बुडवून बसलेले असतात. इतरांना ते काहीही दाखवत असले तरीही त्यांना माहिती असतं की आपण किती पाण्यात आहोत. ज्यांचे देऊळ पाण्यात आहे ते तर नवसही बोलत सुटलेले असतात. त्यांना देव आठवलेले असतात. चारशेचे चाळीस झाल्यावरही ज्यांचे पाय जमिनीला टेकायला तयार नव्हते त्यांना आता देव आठवणे अगत्याचे आहे. दोनचे दोनशे अन्‌ दोनशेचे तीनशे झालेल्यांनी कामे केली आहेत. जनतेला तेच देव वाटू लागले आहेत. जनता विकासाचे नवस त्यांच्याकडे बोलू लागली आहे. त्यामुळे त्यांना देव पूजण्यासाठी मंदिराच्या पायर्‍या झिजविण्याची तशी काहीच गरज नाही. हे मात्र आता जात, धर्म अन्‌ देवदेव करू लागले आहेत. कुठेही गेले की मग मंदिर शोधून माथा टेकवायला जातात. त्याचे फोटो काढून घेतात अन्‌ व्हायरल करतात. जनतेने विश्वास टाकल्यावर लोकशाहीच्या मंदिरात माथा टेकवूनच प्रवेश करणार्‍या अन्‌ गंगेला शुद्ध करणार्‍यांना त्याची गरज नाही. हे मात्र जानवे नेमके कुठे घालायचे हे माहीत नसल्याने कोटावर जानवे घालून आम्ही कसे पवित्र हे दाखवत सुटले आहेत. कॉंग्रेसचे युवराज तर आपले सगळेच विसरले आहे. कधीकाळी ते ‘कॉंग्रेस यह एक सोच है’, असे म्हणायचे. आता त्यांची ही ‘सोच’ बदलली आहे. कारण सत्ताकाळात त्यांनी केवळ ‘शौच’च केली आहे. तेही समजून घेता येईल पण, विरोधात बसण्याची वेळ आल्यावरही त्यांनी दुसरे काहीच केले नाही. सगळी घाणच!
 
 
 
मी काय आहे, हेच ते विसरले आहेत. मोदींवर टीका करता करता हे स्वत:च मोदी होण्याचा प्रयत्न करतात. आता अंधश्रद्धा तर आहेतच. इतकी वर्षे महात्मा गांधींना नवस बोलून सत्ता मिळविली. आता त्यांना वाटते की बापूजी काही कामाचे नाहीत. बरे यांचे सल्लागारही गारेगार आहेत. ते सल्ला देतात की असे असे करा. हेही डोके घरी ठेवून तसेच करतात. आता अलिकडे कॉंग्रेसी युवराजांनी दाढी वाढविणे सुरू केले आहे. कारण दाढीवाल्यांना भाव आहे, असे त्यांना वाटते. विना दाढीने आपण शामळू दिसतो. दाढीने कसे भारदस्त वाटते. छाती नसली तरीही छप्पन्न इंचांची वाटते, असा यांचा गैरसमज. त्यामुळे दाढी राखूनच बढती मिळू शकते, असे वाटते. आता दाढीच नव्हे तर शेपटाही हवा, असेही यांना वाटू लागले आहे. म्हणून मग बहिणीला आणले. जुना शेपटा नि नवी दाढी यांच्या समीकरणाने सत्तेचा सोपान चढता येईल, असे यांना वाटू लागले आहे. दाढीने नवे युग निर्माण होते. त्याला काय म्हणतात? हं, दलिद्दरी संपते, असा यांचा गैरसमज. त्यासाठी मग यांच्याकडे दाखलेही भरपूर आहेत. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या आयुष्याच्या एका वळणावर दाढी राखली होती. त्यांचे हे दाढीधारी रूपही लोकांनी हृदयात साठविले. त्यांचे ज्येष्ठपर्वातले एक नवे युग त्यामुळे सुरू झाले. ती छवी आता जनतेच्या काळजात कायमचे गाभारा करून बसली आहे. फार पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम िंलकन यांनी दाढी राखली होती. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी दाढी राखली नव्हती. ते एका शाळेत गेले कसल्या कार्यक्रमाला अन्‌ तिथे एका नवव्या वर्गातल्या विद्यार्थिनीने त्यांना तुम्ही दाढी ठेवा, भारदस्त दिसाल, असा प्रेमाचा सल्ला दिला अन्‌ त्यांनी तो मानलाही. आता अब्राहम िंलकन यांची कल्पना विना दाढीची आपण करूच शकत नाही... त्यानंतर िंलकन यांची जनतेशी जी काय िंलक जुळली ती काही सुटली नाही. आता पुन्हा एक दाढीधारीच समोर असल्याने अन्‌ डोळे मिटलेत तरीही तोच दिसत असल्याने युवराजांनीही दाढी राखणे सुरू केले आहे.
 
बरे, दाढीने कसे रुबाबदार वाटतो, असे त्यांना वाटते. मर्द वाटावे यासाठी ही दाढी. आता दाढीने असे काही होत नसते, जात्याच माणूस पप्पू नको, हेही कळायला हवे. विनादाढीचा पप्पू ही इमेज काही कुणी तयार केली नाही. ती झाली... आता यांना वाटते की पराक्रम आणि विक्रम करायचा असेल तर दाढीच हवी. त्यासाठी त्यांच्यासमोर महानायकाचीही कहाणी आहेच. अमिताभ बच्चन यांचेही करिअरच्या एका वळणावर ‘बुरे दिन’ सुरू झाले होते. ज्यांचे चित्रपट आले की बुलेट ट्रेनच्या गतीने धावायचे त्यांचे चित्रपट बाराला लागले की साडेबाराला उतरलेले असायचे. मोठ्या पडद्याचा हा ‘जादुगार’ पण त्यांचा याच नावाचा सिनेमाही आपटला अन्‌ मग आपली ही छवी लोकांना बोअर झालेली आहे, हे त्यांच्या लक्षात आले. काही काळ ते अज्ञातवासात गेले. कुठे गेले हेच कळत नव्हते. ते संपलेत, अशीही चर्चा सुरू झाली. मग ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरच ते दिसले अन्‌ नव्या रूपात. त्यांच्या लुक अॅडव्हायजरने त्यांना हा नवा लुक दिला. दाढी आली अन्‌ एक नवे पर्व सुरू झाले. अमिताभ यांच्या आयुष्याचे उत्तरपर्वही असे मग सोनेरी झाले. आता त्यांचा जुना चेहरा आठवतही नाही. हा नवाच जन्म आहे... दाढीचा आणखी एक करिश्मा म्हणजे आपला विराट कोहली. दोन वर्ल्डकप आधी तो मैदानावर आला तेव्हा त्याला दाढी नव्हती. नंतर त्याने दाढी राखणे सुरू केले अन्‌ आता तो भारतीय क्रिकेटचा सम्राटच आहे. शतकांची टांकसाळच उघडली आहे त्याने. त्यामुळे भारतीय संघात नवोदित सगळेच दाढी राखून असतात...
 
त्यामुळे असेल कदाचित; पण आता कॉंग्रेसचे कधीही राजा न होऊ शकणारे युवराजही दाढी राखू लागले आहेत. स्वत:चे असे मोदीकरण करणे सुरू आहे. दाढी तर घर की खेती असते. मग यांनी मातृभक्त अशीही एक प्रतिमा निर्माण करणे सुरू केले आहे. सतत आईच्या पदराखाली राहिल्याने ते ‘ममाज्‌ बेबी’ झाले. मोदींची आई, हा गौरव असतो अन्‌ आईचा राहुल हे परावलंबित्व, हे या बाळाला कळत नाही. त्यात मग मोदींबद्दल भारतीय लोकच म्हणतात, ‘‘वो किसके लिए कमाएंगा? उसका ना कोई घर ना परिवार...’’ म्हणून आता संधी येऊनही युवराजांनी विवाह केला नाही. म्हणजे आता हेही सांगत सुटले आहे स्वत:च, ‘मेरा भी कोई परिवार नही है...’ आता यांच्या पक्षाचा गाडाच एका परिवारावर चालतो. नवा गांधी पक्षाला यांनी दिला नाही तर महात्मा गांधींची हा पक्ष विसर्जित करण्याची इच्छा हे पूर्ण करतील. ‘चलती का नाम गाडी’ असा एक सिनेमा जुन्या काळांत आला होता. किशोर कुमार यांनी त्यावर विडंबन केले अन्‌ ‘बढती का नाम दाढी’ हा चित्रपट केला होता. आता युवराज स्वत:चे असे मोदीकरण करून दाढीधारी होत आहेत. त्यांना कुणी आणखी सल्ला देईल की, केवळ दाढी नाही तर आपल्या चारित्र्य आणि चरित्रा इतकीच शुभ्र, धवल दाढी हवी... तेव्हाच सत्तेत याल. त्यामुळे तशी दाढी येण्यासाठी आणखी काही दशके जाऊ द्यावी लागतील अन्‌ दाढी काही उन्हाने पिकत नाही. लोकही म्हणतील ना, असा नकली मोदी निवडून देण्यापेक्षा अस्सल काम करणारा असली मोदी आहे की आमच्याकडे..!