यंदा १.९ कोटी युवा मतदार
   दिनांक :10-Mar-2019
नवी दिल्ली,
निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण ९० कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये १.९ कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचे सरकार निवडण्यासाठी मतदान करतील, असे निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी जाहीर केले.
 
 
आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत नव्याने नोंद झालेल्या मतदारांची संख्या १.९ कोटी असून त्यामध्ये मतदानाच्या तारखेपर्यंत वाढ होऊ शकते. अद्यापही आयोगाकडून मतदार नोंदणीप्रकिया सुरू आहे. 
 
१ जानेवारी २०१९ पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची आकडेवारी २२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार ८९.७ कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४६.५ कोटी पुरुष तर ४३.२ कोटी स्त्री मतदार आहेत. तसेच ३३,१०९ मतदारांनी स्वत:ला तिसऱ्या प्रवर्गात टाकले आहे. तर, १६.६ लाख मतदार हे नोकरदार असून ते पोस्टल मतदान असणार आहे.