कारची ट्रकला मागून धडक; एकाचा मृत्यू, ४ जण जखमी
   दिनांक :10-Mar-2019
डहाणू/बोर्डी:
 डहाणू जव्हार मार्गावर सरावली येथे कारची ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक बोमी मुबरका (६६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचाराकरीता मुंबईला हलविण्यात आले. रविवारी (१० मार्च) सकाळी दहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

 
 
जोधपूर येथून लग्न समारंभ आटोपून हे पाच जण डहाणू शहरात सरावली येथे येत असताना हा अपघात घडला. ट्रक चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाला वाचवताना ब्रेक दाबल्याने ट्रक कलंडला. यावेळी मागून आलेली स्कोडाकार धडकली. तिचा चक्काचूर झाला. त्यामधील पाचपैकी कारमालक आणि बांधकाम व्यावसायिक बोमी मुबरका याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार पैकी हॉटेल परलॅनचा मालक रॉनी इराणी यांना डहाणूच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या पत्नी परलीन इराणी यांना मुंबईत हलविले आहे. तर इराणीज नर्सिंगहोमचे मालक स्त्रीरोगतज्ञ डॉ. मेरवान इराणी आणि त्यांची पत्नी हे जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती केले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.