पाकिस्तानमध्ये व्हिडियो कॉल करणाऱ्या संशयिताला अटक
   दिनांक :10-Mar-2019
जैसलमेर:
 भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर संतापलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. तसेच या संशयित व्यक्तीने मोबाईलवरून पाकिस्तानमध्ये व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. जैसलमेर येथील सैन्य तळाच्या आसपास ही व्यक्ती फिरत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
  
 
मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेर येथील सोनू या गावाजवळ सैन्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. याठिकाणी एक व्यक्ती फिरताना दिसली. त्याच्या हालचालीवरून पोलिसांना थोडा संशय आला. तसेच त्या व्यक्तीने आपली गाडी उभी करून एक व्हिडीओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी काही लोकांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव फतन खान (३५)  सांगितले. तसेच सियालो येथील रहिवासी असल्याचे सांगितले.
 
 
पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली. तसेच त्याच्याकडून एक पेन ड्राईव्ह, कार्ड रिडर आणि एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. आपले नातेवाईक पाकिस्तानात राहत असून आपण त्यांना व्हिडीओ कॉल करत असल्याची माहिती फतन खानने दिली. तसेच पोलिसांनी त्याचा स्मार्टफोन चेक केला असता २३ फेब्रुवारीला पाकिस्तानात व्हिडीओ कॉल केल्याचे निष्पन्न झाले. फतनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे काही नातेवाईक उमरकोट येथील रहिवासी आहेत. त्यामुळे तो पाकिस्तानात जात असतो. गेल्या दोन आठवड्यात ८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
 
 
 
 \