पुलवामा हल्ल्यानंतर १८ दहशतवाद्यांचा खात्मा
   दिनांक :11-Mar-2019
लष्कराची माहिती  
 
नवी दिल्ली,
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांच्या कारवाईत २१ दिवसांमध्ये १८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती लष्कराने दिली. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत लष्कराचे वरीष्ठ अधिकारी जीओसी केजेएस ढिल्लन यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ठार केलेल्या २१ दहशतवाद्यांपैकी ८ जण पाकिस्तानी होते. यात पुलवामा हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार मुदस्सीर अहमद यालाही कंठस्नान घातलण्यात आले असे ढिल्लन यांनी सांगितले.
 
 
तर, दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची मोहीम सुरूच राहील. तसेच रविवारी पुलवामा जिल्ह्यातील पिंगलिशमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदस्सीर अहमद याचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक स्वयं प्रकश पानी यांनी दिली.
 
मुदस्सीर अहमद यानेच पुलवामा हल्ल्याचा कट रचला होता. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात जैशसाठी तो काम करत होता. मुदस्सीर आणि त्याचे काही साथीदार पुलवामातील पिंगलिश गावात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली. यावेळी झालेल्या चकमकीत मुदस्सीरचा खात्मा करण्यात आला. पिंगलिश गावात सुरक्षा दलांची अजूनही शोध मोहीम सुरू आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याची सविस्तर माहिती देण्यात येईल, असे स्वयं प्रकाश पानी यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यात किती स्थानिक दहशतवादी होते, याचा तपास करत असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.