गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची हत्या
   दिनांक :11-Mar-2019
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
गडचिरोली,
जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना रविवारी (१० मार्च ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. योगेंद्र मेश्राम (रा. बोटेझरी) असे मृत शिक्षकाचे नाव असून ते गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कार्यरत होते.
 
 
मेश्राम यांची पत्नी कस्तुरबा चंदू देवगडे या बोटेझरी येथे कंत्राटी आरोग्य सेविका आहेत. मेश्राम दर शनिवारी पत्नीकडे यायचे. दरम्यान रविवारी ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कोटगुल पोलीस मदत केंद्रात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. गोळ्या झाडल्यानंतर योगेंद्र मेश्राम यांना कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र टेकाम यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे घटनेचा तपास करीत आहेत.