धामणगावात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ
   दिनांक :11-Mar-2019

खरेदी विक्रीच्या कार्यालयासह दोन दुकाने फोडली
 
चोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद
 
धामणगाव रेल्वे : शनिवारी रात्री श्रीकृष्णदास राठी नगरातील मोठ्या घरफोडीनंतर रविवारी रात्री पुन्हा चोरांनी दत्तापूर खरेदी-विक्री सोसायटीचे कुलूप तोडून मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली. वर्दळीच्या ठिकाणांवर झालेल्या या धाडसी चोरीने शहरात चोरांची दहशत निर्माण झाली असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
 

 
 
 
गजबजलेले ठिकाण असलेल्या मुख्य बाजारपेठेतील नूतन चौक येथे मनोज छगनलाल टावरी यांच्या मालकीचे प्रगती स्टोर्स हे कापडाचे दुकान आहे. रविवार १० मार्चला दिवसभराच्या कापडे विक्रीच्या व्यवसायातून व्यापार्‍यांची देयक देऊन उरलेली रक्कम रुपये ४१ हजार ३५० गल्ल्यात ठेवली होती. रात्री दुकान बंद केल्यावर मध्यरात्री चोरट्याने दुकानाचे कोंडा व कुलूप तोडून गल्ल्यातील सदर रक्कमेवर डल्ला मारला. दरम्यान रेल्वे फाटकाजवळ असलेल्या आदेश रॉय यांच्या मालकीचे मानसी बार व रेस्टोरेंट मध्ये सुद्धा याच चोरांनी लोखंडी गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलुपकोंडा तोडून आत शिरून गल्ल्यातील १७ हजार ५०० रोख व रेडमी कंपनीचा ४ हजार किंमतीचा एक मोबाईल फोन लंपास केला आहे. अशा दोन्ही दुकानातील एकूण ६२ हजार ८५० रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. येथवरच न थांबता याच रात्रीत हे सराईत गुन्हेगार स्टेट बँक रस्त्यावरील दत्तापूर खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाचे पाच कुलुपकोंडे तोडून आत शिरले व आतील कपाट तोडून त्यात असलेल्या तिजोरीला उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने यावेळी कोणताही मुद्देमाल हाती लागला नाही. प्रगती स्टोअरच्या मनोज टावरी यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
चोर दुकान फोडत असतांनाचे चित्रीकरण प्रगती स्टोअर व मानसी बारच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. मात्र चोराने आपल्या अंगावर सोलापुरी चादर ओढून स्वतःला लपवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे सदर घटनास्थळावतील कॅमेर्‍याची स्थिती त्याला आधीच अवगत असावी असे बोलल्या जात आहे.
 
दोन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडी प्रकरणात सुद्धा दत्तापूर पोलिसांनी श्वान पथक व फिंगर प्रिंट एक्सपर्ट बोलावूनही आले नव्हते. मात्र कदाचित पुन्हा घडलेल्या या मोठ्या घटनांमुळे त्यांना बोलवावे लागले असावे. त्यामुळे आधीच गंभीरपणे तपास केला असता तर या घटनांची पुनरावृत्ती झाली नसती, अशा प्रतिक्रिया जनतेतून येत असून पोलिस प्रशासनाबद्दल रोष व्याक्त केल्या जात आहे.