इंधन दरवाढ थांबवण्यासाठी सरकारची हालचाल
   दिनांक :11-Mar-2019
नवी दिल्ली,
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचा पुरेसा पुरवठा होऊन त्याचे दर आटोक्यात रहावेत यासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी जगातील सर्वात मोठ्या इंधन निर्यातदार सौदी अरेबियाला गळ घातली आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले सौदीचे पेट्रोलियममंत्री खालिद अल फलिह यांच्याशी झालेल्या बैठकीत प्रधान यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
 
 
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाचे दर चढे असल्याने गेल्या महिनाभरात भारतातील पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे दोन रुपयांची वाढ झाली आहे. अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध लवकरच संपुष्टात येण्याचे संकेत मिळाल्याने आमच्याकडून होणाऱ्या इंधन पुरवठ्यामध्ये आणखी कपात करण्यात येईल, अशी घोषणा रशियाने केली आहे. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादल्याने इराणकडून होणारा इंधनपुरवठा आधीच रोडावला आहे. तसेच, इंधन निर्यातदार देशांच्या संघटनेनेही (ओपेक) या पुरवठ्याच्या बाबतीत आखडता हात घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशाला अमेरिका व सौदी अरेबिया यांचाच आधार असल्याने प्रधान यांनी सौदीला हे आवाहन केले आहे.
दोन्ही देशांच्या पेट्रोलियममंत्र्यांच्या बैठकीबाबतचे पत्रक रविवारी प्रसिद्ध करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधन पुरवठ्यामध्ये सौदी अरेबिया हा सर्वांत महत्त्वाचा देश असल्याने इंधनाचा पुरवठा व किमती संतुलित ठेवण्यात ते निर्णायक भूमिका बजावू शकतात. या बैठकीत प्रधान यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात होणाऱ्या वृद्धीकडे प्रधान यांनी लक्ष वेधले. ओपेककडून इंधनाच्या पुरवठ्यात कपात करण्यात आल्याने सौदीने भारताला अखंडित इंधन व एलपीजी पुरवठा करावा, असे प्रधान यांनी सांगितल्याचे या पत्रकात म्हटले आहे. तर, इंधनाचा घटता पुरवठा व वाढत्या किमती पाहता सौदीने अतिरिक्त इंधन पुरवठा करून या किमती नियंत्रणात राखण्यास मदत करावी, असे आवाहन मी खालिद यांना केले, अशा आशयाचे ट्विट प्रधान यांनी केले.