जागा वाटप आणि रणनीतीसाठी मिळणार फक्त ८ दिवस
   दिनांक :11-Mar-2019
महाराष्ट्रात ११ ते २९ एप्रिल अशा चार टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. कधी नव्हे ते राज्यात चार टप्प्यांत निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांना प्रचाराचे नियोजन करण्याची संधी मिळणार आहे, मात्र अद्याप राज्यात शिवसेना-भाजप युतीचे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागावाटप निश्चित झालेले नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आठवड्याभरात जागावाटपाचे काम उरकून राजकीय पक्षांना प्रचाराचे रणशिंग फुंकावे लागेल.
 

 
महाराष्ट्रात चार टप्प्यांत निवडणूक होणार असून राजकीय पक्षांना प्रचारासाठी जवळपास ४० ते ४५ दिवस मिळणार आहेत. राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात युती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. मात्र युती आणि आघाडी यांच्यातील जागावाटपाचे अद्याप निश्चित झालेले नाही. शिवसेना आणि भाजप यांच्यात किती जागा लढवायच्या हे निश्चित झाले असले तरी कोणत्या जागा लढवायच्या या यादीवर अखेरचा हात फिरविणे बाकी आहे. विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत युतीमधील दोन्ही पक्षांचे एकमत झाले असले तरी पालघर, जालना अशा काही जागांवर वाद असून त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातही कोणी कोणत्या जागा लढवायच्या हे अद्याप ठरायचे आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीला मोठ्या प्रमाणावर अपयश आले होते. त्यामुळे आता हरलेल्या जागांवर कोणी किती काम करून या जागा जिंकण्याच्या परिस्थितीत आणून ठेवल्या आहेत यावर खल सुरू आहे. शिवाय आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, मनसे तसेच इतर काही छोट्या पक्षांना घेण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. ही सर्व प्रक्रिया आघाडीला पुढच्या आठवड्याभरात उरकावी लागणार आहे. युती आणि आघाडीची जागावाटपाची प्रक्रिया जेवढ्या लवकर उरकेल तेवढा त्यांना उमेदवारांचा प्रचार करण्याचा वेळ मिळणार आहे.