पुलवामात चकमक; सुरक्षा दलांकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा
   दिनांक :11-Mar-2019
श्रीनगर,
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी संध्याकाळी चकमक झाली. त्यात जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे.

 
 
पुलवामामधील पिंगलिश गावात रविवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पिंगलिश गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीनंतर लष्कराची ४२ राष्ट्रीय रायफल्सची तुकडी, जम्मू- काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली होती, अशी माहिती सुरक्षा दलांकडून देण्यात आली.
इंटरनेट सेवा बंद
सुरक्षा दलांनी परिसर घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. तसेच प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत तीन दहशतवाद्यांना ठार मारले. परिसरात अजूनही शोध मोहीम राबवण्यात येत आहे. खबरदारी म्हणून सीआरपीएफचे जवान मोठ्या संख्येने तैनात आहेत. याशिवाय इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.