राहुलने आधी या प्रश्नांची उत्तरे द्यावी!
   दिनांक :11-Mar-2019
गांधी-नेहरूंच्या नावामुळे ज्याला वंशपरंपरेने कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद मिळाले, त्या अध्यक्षाने कसे वागावे, हे कॉंग्रेसमधील कुणा जुन्या जाणत्या नेत्याने सांगितले पाहिजे. पण, त्याचे सल्लागार हे राहुलला तर खड्ड्यात घालण्याचे आणि कॉंग्रेस पक्षाचीही बदनामी करण्याचे सल्ले देत आहेत. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने लष्कराला पूर्ण मोकळीक दिल्यानंतर, वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे, मिग-21 चे वैमानिक अभिनंदन पाकिस्तानकडून पकडले जाणे, पण दोनच दिवसांत पाकिस्तानने त्यांना सोडून देणे, यामुळे मोदी सरकारबद्दल जे एक विश्वासाचे वातावरण संपूर्ण देशात तयार झाले, ते पाहून कॉंग्रेस पक्षाचे धाबे दणाणले आहे. प्रामुख्याने युवकांमधील उत्साह तर वाखाणण्याजोगा आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे ग्रहण करताच, मोदींनी संपूर्ण जग पालथे घालून ज्या शंभरेक देशांसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, पाकिस्तान ही दहशतवादाची फॅक्टरी आहे, हे संपूर्ण जगाच्या मनावर ज्याप्रमाणे अधोरेखित केले, त्याचे मोल आता सार्‍या देशाला कळले आहे. कोणतीही लढाई ही केवळ समोरासमोर शस्त्रांनी लढविली जात नाही, तर त्यासाठी जागतिक पािंठबाही आवश्यक असतो. जागतिक लढायांचे आतापर्यंतचे हे सूत्र मोदींनी पूर्ण प्रभावाने वापरले आणि त्यात लक्षणीय यशही मिळाले. पण, मोदी सरकारच्या या यशाची एवढी धास्ती विरोधकांनी घेतली की, त्यांनी मोदींवर टीका करण्याच्या नादात आपल्या वायुसेनेवरच शंका उपस्थित केली आणि किती अतिरेकी मारले, याचा नक्की आकडा सांगा, असा आग्रह धरला. जणूकाही या अतिरेक्यांमध्ये राहुल गांधींचा भाऊ, ममता बॅनर्जींचा भाचा असावा, अशा तोर्‍यात सर्वांनीच वायुसेनेवर टीकेची झोड उठविली. यामुळे जनमानस कॉंग्रेससकट पुरावे मागणार्‍यांच्या आणखी विरोधात गेले. समोर लोकसभेच्या निवडणुका असताना, कॉंग्रेस आणि विरोधकांनी विनाशकाले विपरीत बुद्धी याचा अंगीकार केला, जो आता त्यांच्यावरच उलटणार आहे. पहिल्या सर्जिकल स्ट्राईकच्या वेळीही समस्त विरोधकांनी पुरावे मागून आपल्या अकलेचे दिवाळे काढले होते. पुरावे मिळाल्यानंतर मगच ते गप्प बसले.
 
 
 
आमच्या लष्कराने आतापर्यंत जी युद्धे लढली, भारताची मान सतत उंच ठेवली, त्याबद्दल सन्मानाचा शब्द न काढता, त्यांचा सातत्याने अपमान आणि उपेक्षा कॉंगे्रस सरकारने केली. कारण, सर्वाधिक वर्षे या देशावर कॉंग्रेसचीच सत्ता होती. मोदींनी तर दोन्ही आघाड्या िंजकल्यानंतर आता काय करायचे, या विवंचनेत असताना राहुल गांधी यांनी एका अतिशय संवेदनशील विषयाला हात घातला. कुख्यात दहशतवादी आणि पुलवामा हल्ला ज्याने घडवून आणला, तो जैशचा म्होरक्या मसूद अझहर याला रालोआच्या सरकारनेच सोडले होते, असा आरोप केला. या दिवट्याला नेमके काय घडले होते, भारतीय प्रवाशांचे जीव कसे धोक्यात होते, हे माहीत नसावे. त्यातही वाहिन्यांनी असे काही आगीत तेल ओतले की, सरकार काहीही करीत नाही, असे आरोप होऊ लागले. वास्तविक पाहता, अटलबिहारी वाजपेयी सरकारने स्ट्राईक करून विमानावर अमृतसर आणि दुबई येेथे हल्ला करण्याची योजना आखली होती. अमृतसरमध्ये आखलेली योजना अतिरेक्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे यशस्वी झाली नाही. नंतर दुबईमध्ये विमान उतरले असताना, आपले कमांडो दुबईत हजर होते. पण, कमांडो कारवाई करण्यासाठी युनायटेड अरब अमिरातने संमती दिली नाही. अखेर विमान कंधहारला नेण्यात आले. इकडे प्रवाशांच्या नातेवाईकांचा रेटा आणि वाहिन्यांचा आक्रस्ताळेपणा यामुळे मसूद अझहर आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना सोडून द्यावे लागले. आता कॉंग्रेसने मसूदचा मुद्दा उपस्थित करण्याचा अर्थ म्हणजे, आमचे दोनशे भारतीय मेले असते तरी चालले असते, पण मसूदला सोडायला नको होते. राहुल गांधी हे त्या वेळी 28 वर्षांचे होते. त्यांना तेव्हा किती अक्कल होती, हे देवच जाणो! मसूदबद्दल जर राहुलच्या मनात एवढाच राग आहे, तर त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी राहुल गांधी का करीत नाही? पाकिस्तानचा सातत्याने बचाव करण्याचे कार्य कॉंग्रेसचे नेते का करीत आहेत? राहुलने आता या मुद्यात रस घेतलाच आहे, तर मग ज्या वेळी काश्मीरवर पाकिस्तानने 1948 साली हल्ला केला होता, त्या वेळी भारताचे सैन्य जिवाची बाजी लावून लढले, त्या वेळी नेहरूंनी युद्धविरामाला संमती देण्याचा भित्रेपणा का केला? जनमताची संयुक्त राष्ट्रसंघाची अट मान्य का केली? याचे पुरावे आता राहुलने दिले पाहिजेत. 1962 साली चीनने आपली हजारो मैल भूमी कशी काय हडपली? त्या वेळी वायुसेनेचा वापर का करण्यात आला नाही? 1948 च्या युद्धाच्या वेळीच ज्या माणसाने जीप खरेदीत भ्रष्टाचार केल्याचे, सेकंडहॅण्ड जीपगाड्या खरेदी केल्याचे स्पष्ट झाले असताना, जो चीनचा हस्तक म्हणून काम करतो असा आरोप झाला असताना, कृष्ण मेननसारख्या माणसाला नेहरूंनी संरक्षणमंत्री का केले? आमच्या हजारो शूरवीर जवानांचे रक्त का सांडवले? याचेही उत्तर आता राहुलने दिले पाहिजे.
 
1965 च्या युद्धात लालबहादूर शास्त्रींच्या निर्णायक भूमिकेमुळे आपण पाकिस्तानचा कितीतरी मोठा प्रांत काबीज केला होता. तो ताश्कंद करार करून परत का केला? यात हाजी पीर िंखडही होती. याच हाजी पीरमधून अतिरेक्यांनी प्रवेश करून उरीवर हल्ला केला होता. ते हाजी पीरही परत केले गेले. शास्त्रीजींचा हाजी पीर परत करण्यास तीव्र विरोध होता. मग दिल्लीत ते कोण लोक होते, ज्यांनी दबाव टाकला? लालबहादूर शास्त्री यांच्या हत्येची सखोल चौकशी का करण्यात आली नाही? कुणाला भीती वाटत होती? कुणाला पंतप्रधान होण्याची घाई झाली होती? याचेही उत्तर राहुलने दिले पाहिजे. 1971 च्या युद्धात भारतीय लष्करासमोर पाकिस्तानचे 93 हजार सैनिक शरण आले होते. त्या वेळी आपले एक हजार सैनिक (1965 युद्धातील धरून) पाकिस्तानात युद्धबंदी होते. त्यांना आधी का सोडवले गेले नाही? तसे न करता, 93 हजार पाकिस्तानी सैनिकांना इंदिरा गांधींनी कसे काय सोडून दिले? आमच्या शूरवीर जवानांचा इंदिरा गांधी यांनी सौदा का केला? केवळ मुसलमानांची मते खेचण्यासाठी? याचेही उत्तर राहुलने दिले पाहिजे. राहुल गांधी, मणिशंकर अय्यर, नवज्योत सिद्धू यासह अनेक सुपारी पत्रकारांचे पाकिस्तानसोबत फारच सलोख्याचे संबंध आहेत. आमच्या युद्धबंदींना पाकिस्तानने सोडून द्यावे, अशी मागणी राहुल गांधींनी केली पाहिजे. करणार आहेत का ते? तसेही 1971 चे युद्ध िंजकले गेले ते फील्ड मार्शल जनरल माणेकशा यांच्यामुळे. या यशाचे श्रेय खर्‍या अर्थाने जनरल माणेकशा यांना दिले पाहिजे, इंदिरा गांधींना नाही! ज्या महिन्यात इंदिरा गांधींना युद्ध हवे होते, तेव्हा ते झाले असते तर भारताचा पराभव झाला असता आणि इंदिरेची सार्‍या जगात नाचक्की झाली असती. ती वाचविण्याचे महान कार्य आमच्या लष्कराने केले, याचे भान राहुल आणि सर्वच कॉंग्रेसजनांनी ठेवले पाहिजे. आमच्या लष्करावर शंका घेण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा कॉंग्रेसचा जुना धंदा आतातरी राहुलने आणि विरोधकांनी सोडून दिला पाहिजे आणि देशाची माफी मागितली पाहिजे. तरच त्यांच्या पापाचे थोडेतरी प्रायश्चित्त होऊ शकते...