इंडियन वेल्स टेनिस; फेडरर, नदालची आगेकूच
   दिनांक :11-Mar-2019
द्वितीय विश्वमानांकित राफेल नदालने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत स्थान मिळविले, रॉजर फेडररने सावकाश यशस्वी सुरुवात केली असून तो सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे.
 
तीनवेळचा इंडियन वेल्स विजेता नदालने अवघ्या ७२ मिनिटात जॅरेड डोनाल्डसनवर ६-१, ६-१ असा सहज विजय नोंदविला. नदालचा पुढील सामना अर्जेंटिनाच्या दिएगो श्वाट्‌र्र्झमनविरुद्ध होणार आहे. दिएगोने स्पेनच्या रॉबर्टो कारब‘ेलिसवर ६-३, ६-१ असा विजय नोंदविला.
 
 
 
आजचा दिवस माझ्यासाठी सकारात्मक राहिला. पुढील फेरीतील प्रतिस्पर्धीला मी जाणतो. आम्ही दोेघांनी एकत्रपणे अनेकदा सराव केला व काही सामनेसुद्धा खेळलो आहे, असे नदाल म्हणाला. नदालचा दिएगोविरुद्धचा विजयाचा रेकॉर्ड ६-० असा आहे.
चौथा सीड फेडररने जर्मनीच्या पीटर गोजोविकवर ६-१, ७-५ अशी मात केली. फेडररचा पुढील सामना स्टॅन वावरिंकाशी होणार आहे. वावरिंकाने एक तास २४ मिनिटात २९ वा सीड हंगेरीच्या मार्टोन फकसोविक्सची कडवी झुंज ६-४, ६-७ (५/७), ७-५ अशी मोडून काढली.
 
अन्य सामन्यात सहावा सीड जपानच्या केई निशिकोरीने फ‘ान्सच्या आंद्रियन मन्नारिनोची कडवी झुंज ६-४, ४-६, ७-६ (७/४) अशी मोडून काढली. निशिकोरीचा पुढील सामना पोलंडच्या हबर्ट हर्काझविरुद्ध होईल. हबर्टने फ्रान्सच्या लुकास पाऊलीवर ६-२, ३-६, ६-४ अशी मात केली. आठवा सीड अमेरिकेच्या जॉन इस्नेरने ऑस्ट्रेलियाच्या पात्रताधारी अॅलेक्सी पॉपीरीनवर ६-०, ६-२ अशी एकतर्फी मात केली. आता इस्नेरची गाठ गाईडो पेल्लाशी पडेल. पेल्लाने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स बोल्टवर ७-६ (७/५), २-६, ६-३ अशी मात केली. दहावा सीड क्रोएशियाच्या मारिन सिलिकने सर्बियाच्या दुसान लाजोविकवर ६-३, ६-४ असा विजय नोंदवून पुढील फेरी गाठली. सिलिकचा सामना कॅनडाच्या १९ वर्षीय डेनिस शापोव्हलोव्हविरुद्ध होईल. डेनिसने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनवर ६-३, ६-४ असा विजय संपादन केला.