सायना, समीर नवीन आव्हानासाठी सज्ज; स्वीस ओपन बॅडिंमटन
   दिनांक :11-Mar-2019
ऑल इंग्लंडमधील अपयशामुळे आलेली मरगळ झटकून आता स्वीस ओपन बॅडिंमटन स्पर्धेत दोनवेळची विजेती सायना नेहवाल व गतविजेता समीर वर्मा नव्या उत्साहात नवीन आव्हान पेलण्यास सज्ज झाले आहेत.

 
 
गतवर्षी वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणार्‍या समीरला ऑल इंग्लंडमध्ये उपांत्यपूर्व फेरीत ऑल इंग्लंडचा नवा विजेता केंटो मोमोटाकडून पराभव पत्करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या समीरचा पहिला सामना पात्रताधारी खेळाडूविरुद्ध होईल. दुसर्‍या फेरीत त्याची गाठ भारतीय संघमित्र बी. साई प्रणितशी पडण्याची शक्यता आहे.
 
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ३०० स्पर्धा ही सायनाची या मोसमातील चौथी स्पर्धा राहणार असून यापूर्वी तिने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली. तसेच तिला मलेशिया मास्टर्समध्ये उपांत्य फेरीत, तर ऑल इंग्लंड स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. गत आठवड्यात सायनाला अतिसारचा त्रास झाल्यामुळे बर्मिंगहॅम येथे तिच्या कामगिरीवर परिणाम झाला. आता ती झटपट तंदुरुस्त होऊन पहिल्या फेरीत पात्रताधारी खेळाडूविरुद्ध खेळण्यास सज्ज झाली आहे. यापूर्वी सायनाने ही स्पर्धा २०११ व २०१२ साली जिंकली होती. यंदाच्या स्पर्धेत सर्व सामन्यांचे निकाल अनुकूल लागले तर तिसरी सीड सायनाची उपांत्य फेरीत दुसरी सीड चीनच्या ही बिंगजियाओशी गाठ पडण्याची शक्यता आहे.
 
अन्य भारतीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये सायनाची पती पारूपल्ली कश्यपचा पहिला सामना पात्रताधारी खेळाडूशी होईल. साई प्रणितचा इंग्लंडच्या राजीव आऊसेफशी, तर शुभांकर डे याचा सामना पात्रताधारी खेळाडूशी होईल. महिला एकेरीत वैष्णवी जक्का ही इस्टोनियाच्या क्रिस्टीन कुबाशी दोन हात करेल.
 
अर्जुन एम.आर.-रामचंद्रन श्लोक, मनू अत्री-बी. सुमिथ रेड्डी, अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी तसेच पूजा दांदू-संजना संतोष ह्या जोडीसुद्धा आपले नशिब अजमावणार आहेत.