लोकसभा निवडणुकांच्या तारखा बदला, मुस्लिमांची मागणी
   दिनांक :11-Mar-2019
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा रविवारी घोषित केल्या. या तारखा जाहीर होताच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. तीन राज्य पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा या रमजान महिन्यात येतात. या तारखा बदलल्या जाव्यात अशी मागणी मुस्लिम नेते आणि मौलवींनी केली आहे.
 
 
कोलकाताचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम म्हणाले की, निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था असून आम्ही त्यांचा सन्मान करतो. आम्ही निवडणूक आयोगाविरोधात काही बोलू इच्छित नाही. पण ७ टप्प्यात होणाऱ्या निवडणुका बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या लोकांसाठी कठीण असेल. इतकेच नव्हे तर या निवडणुकीत सर्वाधिक त्रास मुस्लिमांना होईल. कारण या मतदानाच्या तारखा रमजान महिन्यात ठेवण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे इस्लामिक विद्वान, लखनौ ईदगाहचे इमाम मौलाना खालीद रशीद फिरंगी महली यांनीही निवडणुकांच्या तारखांवर प्रश्न उपस्थित केला आहे. मतदानाच्या तारखा या रमजान पूर्वी किंवा ईदनंतर ठेवण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने ६ ,१२ आणि १९ रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर ५ मे रोजी रमजान मुबारकचा चंद्र दिसू शकतो. दि. ६ पासून रमजानचा महिना सुरु होईल. तिन्ही तारखा या रमजानच्या महिन्यात येतील. त्यामुळे मुसलमानांना अडचणीचा सामना करावा लागेल.