धक्कादायक: केशारोपण केल्याने तरुणाचा मृत्यू
   दिनांक :11-Mar-2019
 
मुंबई: केसांची सुंदरता वाढविण्यासाठी केशारोपण करणे एका युवकाच्या जीवावर बेतले आहे. ४३ वर्षीय श्रवणकुमार चौधरी असे या युवकाचे नाव आहे. ते उद्योजक होते.  केशरोपणाच्या प्रक्रियेदरम्यान आरोग्य सुरक्षेची योग्य काळजी न घेतल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 

 
 
 तर केशारोपणानंतर झालेल्या जीवघेण्या ॲलर्जीमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांचे मत आहे. श्रावण कुमार चौधरी यांना शुक्रवारी पवईतील हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर आणि घशाला सूज होती. जीवघेण्या अशा 'ॲनाफायलॅक्सिस' या ॲलर्जीमुळेच चौधरींचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. चौधरींचा शनिवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास मृत्यू झाला. चौधरी यांनी पंधरा तासांहून अधिक काळ चालणाऱ्या प्रक्रियेदरम्यान जवळपास ९५०० केसांचे प्रत्यारोपण करून घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.