हाफिज सईदवर ईडीची कारवाई
   दिनांक :12-Mar-2019
- भारतातील संपत्ती जप्त
 
 
 
नवी दिल्ली,
पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी संघटन लष्कर-ए- तोयबाचा प्रमुख आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. ईडीने हाफिजचा गुरुग्राममधील बंगला जप्त केला असून या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समजते.
एका वृत्तवाहिनीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिजने काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली याच्या मदतीने गुरुग्राममध्ये बंगला विकत घेतला होता. या बंगल्यासाठीचे पैसे त्याने फलाह-ए- इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेच्या माध्यमातून उभे केल्याचा संशय ईडीला आहे. जहूरला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादाला आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून हाफिज सईदच्या मालमत्तेचा उलगडा झाला.
बंगल्यासाठीचे पैसे यूएईतून हवालामार्गे भारतात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करुन भारतात तब्बल 24 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे. उर्वरित मालमत्तांवरही लवकरच जप्तीची कारवाई केली जाईल, असे ईडीतील सूत्रांनी सांगितले. मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडीने गोळा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक हाफिजवर मुंबई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने १० डिसेंबर २००८ बंदी घातली असून प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचे सईदचे अपील संयुक्त राष्ट्राने नुकतेच फेटाळले आहे.