काँग्रेसला धक्का; विखे-पाटलांचे चिरंजीव भाजपात
   दिनांक :12-Mar-2019
भाजपाच्या तिकिटावर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार 
 
 
 
मुंबई, 
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी  विविध पक्षांशी आघाडी करणाऱ्या आणि मोदी-शाह जोडीला मात देण्यासाठी सर्व शक्तीनिशी मैदानात उतरलेल्या काँग्रेसला आज महाराष्ट्रात मोठा धक्का बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपात प्रवेश केला असून विरोधी पक्षनेत्याच्या घरातूनच झालेलं हे बंड काँग्रेसला किती महागात पडेल हे येणार काळच ठरवेल. सुजय यांच्यासह नगरमधील काही काँग्रेस नेत्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
 
 
सुजय विखे यांना काँग्रेसच्या तिकिटावर नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. मात्र, आघाडीच्या जागावाटपात  नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने विखेंना तिकीट मिळवून देण्यासाठी काँग्रेसला अनेक तडजोडी कराव्या लागणार होत्या. राधाकृष्ण विखे यांनीही पुत्रासाठी पक्षाकडे तसा आग्रह धरला होता.
 
 
 
राष्ट्रवादीकडून नगरची जागा देण्यास नकार देण्यात आल्यानंतर काँग्रेसकडूनही फारसे प्रयत्न न झाल्यामुळे सुजय यांची भाजपाशी बोलणी सुरू होती. त्यानंतर आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये सुजय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. सुजय यांना भाजपा नगरमधून लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.