परराष्ट्र सचिव विजय गोखले अमेरिका दौऱ्यावर
   दिनांक :12-Mar-2019
वॉशिंग्टन
परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली असून, ते अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पेओ यांच्यासह अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. पुलवामा हल्ला आणि त्यानंतरच्या भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, गोखले यांचा हा दौरा आहे. यामध्ये परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
 
 
गोखले यांचा हा दौरा तीन दिवसांचा असून, रविवारी ते अमेरिकेत पोहोचले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यामध्ये पोम्पेओ यांची सक्रिय भूमिका होती, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने नमूद केले आहे. पुलवामाचा हल्ला करणाऱ्या जैश-ए-महंमद आणि त्यांचा म्होरक्या अझर मसूदवरील बंदीसाठी अमेरिकेनेही दबाव आणण्यास सुरुवात केल्यानंतर, गोखले यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे, मसूदवरील बंदीच्या प्रक्रियेला बळच मिळेल, असा अंदाज आहे. शिष्टाचारानुसार, परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र सचिव यांची भेट होत नाही. मात्र, काही वर्षांपासून भारतीय परराष्ट्र सचिवांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये ते परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतात, त्यानुसारच गोखले यांची पोम्पेओ यांच्याशी भेट होत असल्याचे सांगण्यात येते.