हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल
   दिनांक :12-Mar-2019
अहमदाबाद,
गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अहमदाबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज अहमदाबादमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. या ठिकाणाहूनच आज काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. या बैठकीला पूर्व उत्तर प्रदेशासाठी सरचिटणीस म्हणून निवड झालेल्या प्रियंका गांधी उपस्थित आहेत. याशिवाय, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
 
 
दरम्यान, गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा हात धरुन हार्दिक पटेल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तरप्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते. महत्त्वाचे म्हणजे या युतीमध्ये काँग्रेसला वगळण्यात आले आहे.