लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा!
   दिनांक :12-Mar-2019
 
लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. शनिवारी निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील असा अंदाज होता, पण निवडणूक आयोगाने रविवारी तारखा जाहीर करून सवार्र्ंना आश्चर्याचा धक्का दिला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील सतराव्या लोकसभेसाठी, देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 2014 च्या निवडणुकीत देशात नऊ टप्प्यांत मतदान झाले होते, तर 2009 मध्ये पाच टप्प्यांत. 90 कोटी मतदार यावेळी आपला मताधिकार बजावणार आहेत आणि तेच या निवडणुकीत निर्णायक भूमिका वठवतील, हे निश्चित!
 


 
उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांत सर्व म्हणजे सातही टप्प्यांत मतदान होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था स्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने देशातील काही राज्यांत एकापेक्षा जास्त टप्प्यांत निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्यही आहे. लोकसभेसोबत आयोगाने ओडिशा, सिक्कीम, आंध्रप्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान घेतले जाईल, असा अंदाज होता. पण, आयोगाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती लक्षात घेऊन विधानसभा निवडणूक घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे आयोगाच्या या निर्णयावर टीका केली जात असली, तरी आयोगाला परिस्थितीनुसार आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. निवडणुकांच्या तारखांवरूनही आता काही जण आक्षेप घेत आहेत.
 
मे महिन्यात रोजे येत असल्यामुळे मुस्लिम बांधवांना मतदान करण्यात अडचणी येतील, असे बोलले जाते. काही िंहदू नेत्यांनीही  हिंदू सणांवरून असाच राग आळवला आहे. निवडणूक आयोगाची भेट घेण्याची तयारी काही नेत्यांनी चालवली असली, तरी यातून फार काही साध्य होईल, असे वाटत नाही.
 
2014 च्या तुलनेत यावेळी मतदारांच्या संख्येत 8.5 कोटींनी वाढ झाली आहे. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला जन्म झालेले 18 ते 19 वयोगटाचे दीड कोटी मतदार यावेळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. हा त्यांच्या आयुष्यातील मोठा क्षण म्हणावा लागेल. देशाचा भाग्यविधाता निवडण्याची संधी या वर्गाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मतदान करणार्‍या युवावर्गात मोठा उत्साह संचारणे स्वाभाविक आहे. आपल्या मताधिकाराचा- मग तो पहिल्यांदा मतदान करणारा असो की अनेकवेळा- जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता तसेच जातिधर्माच्या आणि संकुचित भावनांच्या बाहेर येऊन राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदान करताना, ‘मला काय मिळाले’ किंवा  ‘मला काय मिळणार’ याचा विचार न करता, ‘माझ्यामुळे देशाला काय मिळणार आहे’, ‘मी देशाला काय देऊ शकतो,’ याचा विचार सवार्र्ंनी करणे आवश्यक आहे. ‘माझ्यामुळे देश नाही, तर देशामुळे मी आहे...’ ही भावना जपणे आवश्यक आहे.
 
मुळात प्रत्येकाने स्वत: मतदान करणे, आपल्या कुटुंबातील तसेच परिसरातील सर्वांना मतदान करायला लावणे, हे जागरूक नागरिक म्हणून सर्वांचे कर्तव्य आहे. मात्र, मतदानाबाबत आपल्या देशात अजूनही पाहिजे तेवढा उत्साह दिसत नाही. त्यामुळे एखाद्दुसरा अपवाद वगळता, पन्नास ते साठ टक्क्यांच्या वर मतदान झाल्याचे दिसत नाही. यावेळी किमान सत्तर टक्के मतदान व्हावे, असे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने ठेवले आहे. मतदानाच्या दिवशी सर्वांना मतदान करता यावे म्हणून राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यात येत असते, पण या सुटीचा उपयोग बहुतांश जण सहलीसाठी करतात, हे योग्य नाही. ही सुटी सहलीसाठी नाही, तर तुम्हाला तुमचा मताधिकार बजावण्यासाठी दिलेली आहे, याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. जगातील काही देशांत मतदान सक्तीचे करण्यात आले आहे. आपल्याही देशात मतदान सक्तीचे करावे, अशी मागणी अधूनमधून केली जाते. पण, कोणत्याही गोष्टीची सक्ती ही उपयोगाची नसते.
 
आपल्या देशात निवडणुकीत नोटाचा वापर फार आधीपासून केला जातो. मात्र, निवडणूक आयोगाने आता नोटाच्या वापराला अधिकृत मान्यता दिली आहे. मात्र, आपल्या देशात आधीपासून होत असलेला नोटाचा वापर तसेच निवडणूक आयोगाला अपेक्षित असणारा नोटाचा वापर, यात जमीन-आस्मानचा फरक आहे. उमेदवारांच्या यादीतील एकही उमेदवार आपल्याला निवडून देण्याच्या योग्यतेचा वाटत नसल्यामुळे मी कोणालाही मत देत नाही, असे बटन दाबणे म्हणजे नोटा. मुळात मतदारांना नोटाचा वापर करायची इच्छा होणे, हे आपल्या देशातील राजकीय पक्षांचे अपयश म्हणावे लागेल. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नोटाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. भाजपाच्या या राज्यातील पराभवाची जी कारणे आहेत, त्यात नोटाचा मोठा वापर, हेही एक महत्त्वाचे कारण ठरले. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत नोटाचा कमीत कमी वा नाहीच्या बरोबर वापर होणे, हे निकोप तसेच प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.
 
देशातील ही पहिली लोकसभा निवडणूक नसली, तरी यावेळी निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सत्ताधारी पक्षासमोर आपली सत्ता टिकवण्याचे, तर विरोधी पक्षांसमोर सत्ताधारी पक्षाकडून सत्ता हिसकावण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत विरोधी पक्ष विसकळीत आहे. यावेळी निवडणूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अन्य सर्व विरोधी पक्ष, अशी होत आहे. मोदींचा सामना करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना आपसातील मतभेद विसरून एकत्र यावे लागणे, हे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचे मोठे यश म्हणावे लागेल. भ्रष्टाचार हटवण्यासाठी मोदींनी केलेल्या कामाला सर्वांनी सलामच केला पाहिजे! मोदींच्या देशभक्तीबद्दल तसेच देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी ते रात्रंदिवस घेत असललेल्या मेहनतीबद्दल कुणी शंका घेऊ शकत नाही. मोदींच्या विरोधात बोलण्यासाराखे काही नसल्यामुळे खोटेनाटे आरोप मोदींवर केले जात आहेत. पाच वर्षांच्या कार्यकाळात मोदी यांनी केलेला देशाचा विकास सर्वांच्या समोर आहे. विकासाची ही प्रक्रिया कायम ठेवण्यासाठी तसेच त्याला आणखी गती देण्यासाठी केंद्रात पुन्हा मोदींचेच सरकार यावे, अशी देशातील जनतेची इच्छा आहे. मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे, महाशक्तीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे, त्यामुळे ‘‘कहो दिलसे, मोदी फिरसे...’’ असे कोट्यवधी देशवासी उगीचच म्हणत नाहीत!
 
त्यामुळे निवडणूक जाहीर होत असताना एका वाहिनीने जो ओपिनियन पोल जाहीर केला, त्यात रालोआला पुन्हा सत्ता मिळत असल्याचे दाखवले आहे. विरोधी पक्षांत, पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बािंशग बांधून अनेक नेते बसले असले, तरी मोदींच्या कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची बरोबरी करू शकेल असा एकही नेता नाही. यावेळच्या लोकसभेच्या निवडणुका देशाचे भवितव्य ठरवणार्‍या आहेत. आपली छोटी चूकही देशाला किमान पन्नास वर्षे मागे नेईल, याची जाणीव मतदारांनी ठेवली पाहिजे; तसेच ज्याच्या हातात आणि नेतृत्वात देशाचे भवितव्य सुरक्षित राहील असे सरकार निवडले पाहिजे...